Breaking News

आरक्षणाच्या पलिकडे जावून चळवळी उभारल्या पाहिजे : सिद्धार्थ खरात

बुलडाणा, दि. 30 - आरक्षण हे केवळ सामाजिक प्रतिनिधीत्व आहे, समाजाच्या प्रगतीची हमी नव्हे, एका व्यक्तीला आरक्षणाने नोकरी मिळाली म्हणून समाजाची प्रगती होत नाही तर आरक्षणाच्या पलिकडे जावून नोकर्‍या देणार्‍या संस्था व चळवळी उभारल्या पाहिजे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय मुंबईचे सहसचिव सिद्धार्थ खरात यांनी केले. मलकापूर येथील लायब्ररीच्या भव्य प्रांगणात जयभीम मित्रमंडळाच्या वतीने 28 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता तथागत गौतम बुद्ध जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहसचिव सिद्धार्थ खरात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘पीरिपा’चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सावळे होते. तर प्रमुख उपस्थितीत आ.चैनसुख संचेती, नगराध्यक्ष अ‍ॅड.हरीश रावळ, माजी नगराध्यक्ष रशिदखाँ जमादार, दिलीपभाऊ देशमुख, नगरसेवक प्रमोद अवसरमोल, काँग्रेस नेते डॉ.अरविंद कोलते, प्रशांत सोनुने, पुरुषोत्तम बोर्डे, गजानन तायडे होते. 
यावेळी सिद्धार्थ खरात आपल्या भाषणात म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मंत्र दिले. उद्योपती व्हा, श्रीमंत व्हा. असे मंत्र त्यांना देता आले असते परंतु त्यांनी तसे काही सांगितले नाही. त्यांनी दिलेला एक महत्वाचा मंत्र म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. कारण शिक्षण हे सर्व उद्योजकतेचे मूळ आहे. ज्यांचे शिक्षण पक्के त्याचा कोणत्याही क्षेत्रातील उद्योग पक्का. बाबासाहेबांनी सांगितले शिका! म्हणून आम्ही शिकलो इतके की साठ वर्षांत आम्ही शिक्षणात इतर समाजघटकांच्या बरोबरीने आलो. नेट, सेट, पीएचडी, बीएड, डीएड पात्रताधारकांची अमाप संख्या झाली. पात्रता मिळवली परंतु आरक्षणांतर्गत नोकर्‍या नाहीत. पात्र सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. आरक्षणाद्वारे मिळणार्‍या नोकर्‍याही कमी पडल्या. आरक्षण हे केवळ सामाजिक प्रतिनिधीत्व आहे. समाजाच्या प्रगतीची हमी नव्हे एका व्यक्तीला आरक्षणाने नोकरी मिळाली म्हणून समाजाची प्रगती होत नाही. तर आरक्षणाच्या पलिकडे जावून नोकर्‍या देणार्‍या संस्था, उद्योग, व्यवसाय व संपत्ती निर्माण करणारी केंद्रे उभी करण्यासाठी समाजातील सुजान घटकांनी पुढे आले पाहिजे. त्यासाठी प्रसंगी सामाजिक चळवळी उभारल्या पाहिजे, असे बहुमुल्य मार्गदर्शन मंत्रालयीन सहसचिव सिद्धार्थ खरात यांनी केले. तर आमदार चैनसुख संचेती यांनी तथागत गौतम बुद्धांनी दिलेला मार्ग स्वीकारल्यास आयुष्य सुखमय होते. म्हणून शांतीचा मार्ग स्वीकारुन आपली प्रगती साधेल तोच सर्वश्रेष्ठ होय, असे सांगितले. संचलन सु.मा.शिंदे यांनी केले तर गजानन तायडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश तायडे, रवी गवांदे, मयुर इंगळे, सुरेश अवसरमोल, विजयराज तायडे, प्रशांत वाघमारे, विजय अवसरमोल, सागर वाकोडे, निखिल सावळे, अमोल सुरडकर यांनी केले.
यावेळी डॉ.अशोक सुरळकर यांना  मान्यवरांच्या हस्ते बुद्धभूषण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. तर सुप्रसिद्ध गायक सरवर जॉनी यांचा बुद्ध व भीमगीते कव्वालीचा बरदार कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली.