Breaking News

शेतकर्‍यांना शंभर टक्के अनुदानावर बियाणे द्या!

बुलडाणा, दि. 30 - तालुक्यातील जास्तीत जास्त क्षेत्र हे खार पाणपट्यात येते. बागायती क्षेत्र कमी असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी सोयाबीन व तुर या पीकांची लागवड करतात. गतवर्षी सोयाबीन व तुर या पिकांचे उत्पन्न फार मोठ्या प्रमाणावर झाले. मात्र शेतकर्‍यांना नोटाबंदीमुळे आपला माल कवडीमोल भावात विकावा लागला. तर काही शेतकर्‍यांची तुर नाफेड अंतर्गत खरेदी केल्यानंतर अद्यापही त्यांना धनादेश मिळाले नाहीत. अशा परिस्थितीत शेतकरी हा कर्जबाजारी झाला आहे. यंदा मान्सून लवकर दाखल होत असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. म्हणून उन्नत शेती, समृद्ध शेतकरी या कार्यक्रमांतर्गत शासनाच्या वतीने 100 टक्के अनुदानावर शेतकर्‍यांना बी-बियाणे देवून त्यांच्यावरील कर्जाजा बोजा कमी करावा, अशी मागणी युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय हागे, कडूबा भोलनकर, सागर अत्तरकार, दिपक राजपूत, कैलास गावंडे संतोष लांबे, श्रावण गवळी, संजय सुरवाडे, निखील चौधरी आदींनी शेगाव तहसिलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.