Breaking News

दारुधंद्यांविरोधात कोरेगावात महिलांकडून रास्ता रोको

कोरेगाव, दि. 24 (प्रतिनिधी) : कोरेगाव नगरपंचायत हद्दीतील एकंबे रस्ता परिसरामध्ये दारु विक्री दुकाने व बीअर बारला परवाना देण्यात येवू नये, या मागणीसाठी परिसरातील ग्रामस्थांसह शेकडो रणरागिणींनी कोरेगाव पंचायत समितनजीक सातारा-पंढरपूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. त्यांनी आता कायमस्वरुपी दारुबंदीसाठी रणशिंग फुंकले. 
कोरेगाव शहरामध्ये देशी-विदेशी दारु दुकाने, परमीट रुम, बीअरबार, बीअर शॉपी अशा मद्य विक्री केंद्रांची रेलचेल आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये कोरेगाव शहरातील जवळपास सर्वच दारु दुकाने बंद झाली. त्यामुळे लाखो रुपयांची गुंतवणूक केलेल्या मालकांची आर्थिक कोंडी झाली. त्यात 500 मीटर अंतर सोडून नव्याने दारुची दुकाने सुरु करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या होत्या.
कोरेगाव शहरानजीक पाचशे मीटर अंतरापलीकडे काही जणांनी जागा घेऊन बांधकाम सुरु केले होते. कोरेगाव-एकंबे मार्गावर प्रभाग क्र. 4, 5, 6 मधील रहिवासी असणार्‍या महिला व ग्रामस्थांना याची कुणकुण लागली. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी या विभागात दारु दुकाने होऊ नयेत यासाठी हरकत घेऊन नगरपंचायत, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, प्रांत व तहसील कार्यालयांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन दिले होते. मात्र, प्रशासनाने या निवेदनाची दखल न घेतल्याने प्रभाग क्र. 4, 5, 6 मधील शेकडो महिला व ग्रामस्थांनी सकाळी 11 वाजता सातारा-पंढरपूर रस्त्यावर कोरेगाव पंचायत समितीनजीक येऊन निषेधाच्या घोषणा देत रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. शेकडो रणरागिणींनी दारु धंद्याला प्रोत्साहन देणार्‍या कोरेगाव नगरपंचायतीच्या  पदाधिकार्‍यांचा निषेध केला. रास्ता रोको आंदोलनात अ‍ॅड. पुरुषोत्तम बारसावडे, भानुदास बर्गे, किरण तानाजी बर्गे, अ‍ॅड. प्रभाकर विश्‍वासराव बर्गे, अ‍ॅड. प्रदीप बर्गे, राजेंद्र बर्गे, विवेक चव्हाण, राजेंद्र विश्‍वनाथ बर्गे, जयवंत शिंदे, प्रभाकर धोंडीराम बर्गे यासह शेकडो ग्रामस्थांसह महिला उपस्थित होत्या. परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक रागसुधा रामचंद्रन यांनी पोलीस जवानांसह चोख बंदोबस्त ठेवला. आंदोलनादरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सुनील खराडे, उपनिरीक्षक उत्तम सावंत आदी उपस्थित होते.