Breaking News

मराठा क्रांती मोर्चाला जाहीर आव्हान

दि. 03, मे - जुनच्या पहिल्या आठवड्यात बळीराजा संपावर जातोय .दुध भाजीपाला फळं कुठलाच माल शेतकरी या काळात विकणार नाही.हतबल झालेल्या बळीराजाने नाईलाज म्हणून हे पाऊल उचलले आहे. हे पाऊल दमदारपणे पडावे म्हणून क्रांती मोर्चाने या संपाला यश मिळवून देण्याचे आव्हान स्वीकारावे...
मराठा तितुका मेळवावा अशी हाक देऊन अखिल मराठा समाज गेले वर्षभर रस्त्यावर आहे. या संघर्षातून समाजाच्या पदरात प्रत्यक्षात काय पडले हा भाग संशोधनाचा म्हणून अलाहिदा.......तरीही समाज म्हणून अस्मिता जागृत झाली आणि त्यातून ऐक्य नव्याने उदयाला आले ही समाजासाठी फार मोठी देणगी आहे हे विसरून चालणार नाही.
बहुजन समाजातील एक प्रमुख आणि संख्येने मोठा असलेला हा समाज पहिल्यापासून राज्यकर्ता वर्ग म्हणून ओळखला जातो. या भुमिकेतून बहुजन समाजातील अन्य घटकांना विशेषतः इतिहासाच्या जुलमी चरकात पिसलेल्या उपेक्षित समाजाच्या पदरात न्याय टाकण्याचे धोरण स्वातंञ्यानंतर राजसत्तेने स्वीकारली. एकुणच तत्कालीन सामाजिक विषमता लक्षात घेता बहुजन समाजात बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाने किरकोळ राजकीय अपवाद वगळता या धोरणाचे स्वागत केले.
महाराष्ट्राच्या  ग्राम व्यवस्थेत अवघा समाज बंधुत्वाच्या भावनेतून वावरत होता आणि आहे.माञ राजकारण्यांच्या सत्तापिपासू प्रवृत्तीमुळे मतांचा अनुनय बहुजन समाजात मतभेदाचे राजकारण खेळले गेले.त्याचा दृश्य परिणाम गेल्या दहा बारा वर्षात गंभीर स्वरूपात समोर आला.
गेले वर्षभर महाराष्ट्रात जातीय अस्मितेचे पिक आले त्यामागे ही पार्श्‍वभुमी आहे.यात मराठा समाजानंतर बहुजन समाजातील अन्य घटक समाजानेही क्रांती मोर्चाच्या झेंड्याखाली ऐक्य साधले. क्रांती मोर्चांची धग लागूनही सामाजिक सलोखा काही मंडळींच्या अपेक्षांना धक्का देऊन शाबूत राहीला हे विशेष.ही महाराष्ट्राच्या विचारांची ताकद आहे हे मान्य केले तरी काही प्रश्‍न अनुत्तरीतच आहेत.
मराठा क्रांती मोर्चा असो नाही तर बहुजन क्रांती मोर्चा या मोर्चांचा मुळ ऊद्देश माञ सफल झाला नाही. राज्यातील सामान्य माणसाला न्याय देण्यात या मोर्चांना तसुभरही यश आल्याचे दिसत नाही, मराठा क्रांती मोर्चाला कोपर्डीच्या घटनेची पार्श्‍वभुमी असली तरी ते एक निमित्त होते.राज्यकर्ता म्हणविणार्‍या मराठा समाजाचे अनेक प्रश्‍न प्रलंबित होते,आहेत. मुठभर मंडळींनी कारभार करून स्वकुळाचा उध्दार केलाही असेल त्यावरून अखिल मराठा समाजाला पुढारलेला ठरवून, प्रश्‍न दुर्लक्षित केल्याची घोडचुक क्रांती मोर्चाच्या उद्रेकाला कारणीभुत ठरली होती. तोंड दाबून बुक्क्यांचा मारा या समाजाला खावा लागत होता. आपलेच दात आपले ओठ चावत होते. घळघळणार्‍या जखमांच्या वेदना सांगणार तरी कुणाला? मराठा क्रांती मोर्चा त्याचाच संयुक्तिक परिपाक होता. आणि म्हणून बायका पोर तरूण तरूणी वृध्द झाडून सारे आपल्या भावना मोकळ्या करीत रस्त्यावर आले. यावेळी आणखी एक बाब प्रकर्षाने उल्लेखनीय ठरली.या चळवळीचे नेतृत्व तरूणांनी केले. पोक्त मस्त धंदेवाईक राजकीय पुढार्‍यांना जाणीवपुर्वक दुर ठेवले. नवे तरूण नेतृत्व उदयाला आले. ही सारी पोरं शेतकर्‍याची आहेत. बाप आयुष्यभर माती उपसून थकला पण त्याच्या कपनीला थिगळ लावण्या इतपतही उत्पन्न त्याच्या हाती येत नाही. कधी निसर्ग तर कधी विसर्ग(रोटेशन) तोंडचा घास ओढून नेण्यासाठी टपलेला. कधी बाजारातले दलाल तर कधी सावकार दरोडा टाकण्यासाठी दबा धरून बसलेले.उत्पादन खर्च आणि हाती पडणारे उत्पन यांचा मेळ कधी बसलाच नाही. अखेर कच्याबच्यांना वार्‍यावर सोडून गळ्याला कासर्‍याचा फास लावण्याची वेळ बापावर आल्याचे तरूणांनी पाहीले. तोच संताप क्रांती मोर्चांतून दिसला.
आजही परिस्थिती तीच आहे. सरकारं बदलतात. पण शेतकरी आहे तिथंच. तोच कासरा अन् तोच गळा... मराठा क्रांती मोर्चा प्रचंड यशस्वी झाल्यानंतर या बापाला न्याय मिळवून देण्यासाठी क्रांती मोर्चाचे नेतृत्व करणारे, आणि उत्स्फूर्त सहभाग नोंदविणारे पाऊले उचलणार आहेत की नाहीत हाच खरा प्रश्‍न आहे. मराठा समाजात बहुसंख्य नव्हे जवळपास सर्वच शेतकरी आहेत. शेतकर्‍यांचे प्रश्‍न हेच मराठा समाजाचे मुळ प्रश्‍न आहेत.या प्रश्‍नांना उत्तर मिळाले तर आरक्षणासारख्या कळीच्या मुद्दाला विशेष महत्व देण्याचीही गरज भासू नये.
मराठा समाजाला आरक्षण मिळायचे असेल तेंव्हा मिळेल ,शेतकर्यांंचे प्रश्‍न युध्दपातळीवर सोडविणे महत्वाचे आहे. शेतकर्‍यांना उत्पादन खर्चावर आधारीत हमीभाव मिळाला तर कर्जबाजारी व्हायची वेळ शेतकर्यावर येणार नाही. अनेक प्रश्‍न  निकाली निघतील म्हणूनच शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर मराठा क्रांती मोर्चाने लक्ष केंद्रीत करणे काळाची गरज आहे. जुन महीन्यात बळीराजाने संपावर जाण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. हा मनोदय कणखर बनविण्यासाठी क्रांती मोर्चाने पाठबळ उभे करायला हवे.साधारपणे  जुन ते  जुन या आठवडाभराच्या कालावधीत शेतकरी कुठलाच माल विकणार नाही.म्हणजे दुधापासून भाजीपाल्यापर्यंत...मिरचीपासून फळ फळावळपर्यंत...शेतकर्‍यांचा हा निर्धार बळकट करण्यास क्रांती मोर्चाने पाठबळ दिल्यास शेतकर्याला नेहमी पाण्यात पाहणार्‍या, शेतकर्‍यांच्या कष्टाचे बार्गेनिंग करणार्‍या शहरी बाबूंना खरा हिसका दाखवता येईल. यात शहरात राहणार्‍या इतर शेतीशी नातं सांगणार्‍या मंडळींनीही या संपाची धग सोसून आपल्या अन्नदात्याचे भविष्य घडविण्यासाठी योगदान द्यावे. पुन्हा हा सारा प्रपंच खांद्यावर घेऊन क्रांती मोर्चाने आपल्या बापाचा संप यशस्वी करण्याचे आव्हान स्वीकारावे.दुध भाजीपाला मिळणे अवघड झाले की तिसर्‍याच दिवशी सरकार भानावर येईल. एक आव्हान क्रांती मोर्चाने स्वीकारायला हरकत नाही.
दगडधोंड्यांचा ,गड किल्यांचा साधु  संतांचा हा महाराष्ट्र...छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या स्वराज्याला पुरोगामी विचारांची भक्कम तटबंदी बांधणारे म. फुले, राजश्री शाहु महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांचा हा महाराष्ट्र... बारा बलुतेदार आठरा पगड बहुजनांचा हा महाराष्ट्र तोडण्याची सुपारी घेणारे दलाल सर्वच समाजाच्या बीळात दडले आहेत.कोण आहेत हे दलाल? काय कुट शिजवले त्यांनी? बहुजनांच्या ऐक्याला जातीय मतभेदांचा सुरूंग लावणारे सुपारीखोर कोण? त्यांच्या नाकात वेसण कोण घालणार? य सर्व प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न... लवकरच अ‍ॅड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर,पुरूषोत्तम खेडेकर, म. ना. कांबळे यांच्या सारख्या समाज अभ्यासकांची मॅरेथान मुलाखत...