Breaking News

गारपीटीनंतर पंचनाम्यासाठी टाळाटाळ

महसूल विभागाकडून वेळकाढूपणा  नाशिकमध्ये संतप्त शेतकर्‍यांचा रास्तारोको

नाशिक, दि. 03 - नाशिकच्या सटाणा तालुक्यात काल झालेल्या गारपीटीनंतर आज शेतकरी आक्रमक झालेले पाहायला मिळाले. नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यास महसूल विभागाचे अधिकारी वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे.संतप्त शेतकर्‍यांनी नामपूर रस्त्यावर दोन तास रास्तारोको केला. तसंच आमदार दिपीका चव्हाण आणि तहसिलदारांना घेरावही घालण्यात आला. अखेर दिपीका चव्हाण यांनी नुकसान भरपाईचं आश्‍वासन दिल्यानंतर रास्तारोको मागे घेतला गेला. सटाणा तालुक्यातील अनेक गावात काल अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच काही भागात गारपीटही झाली. काल दुपारी अंबासन आणि आसखेडा या गावात गारपीट झाली. त्यामुळे अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने डाळिंब, कांदा पिकांचंही नुकसान झालं. सटाणा तालुक्यातील नामपूर परिसराला रविवारी दुपारी 1 वाजण्याच्या  सुमारास गारपीट, वादळी वार्‍यासह जोरदार पावसाने झोडपलं. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांची चांगलीच तारांबळ उडाली.  वादळी वारा आणि गारपीटीमुळे परिसरातील कांदा, गहू, डाळींब, कांदा बियाणांचं मोठं नुकसान झालं आहे.