Breaking News

केजरीवाल सरकार घोटाळ्यांच्या जाळ्यात ’गुंतले’

नवी दिल्ली, दि. 12 - दिल्लीचे माजीरी कपिल मिश्रा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोप केल्यानंतर संपूर्ण केजरीवाल सरकार घोटाळ्यांच्या जाळ्यात गुंतल्याचे दिसत आहे. 
केजरीवाल आणि त्यांच्या सहकार्‍यांवर दिल्ली पोलीस, केंद्रीय अन्वेषण विभाग, प्राप्तिकर विभाग, पंजाब पोलीस आणि निवडणूक आयोगाकडून आरोप करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दिल्ली सरकारच्या लाच लूचपत प्रतिबंधक विभागाकडूनही चौकशी सुरू आहे. केंद्र सरकार आम आदमी पक्षाच्या मागावर असून दिल्लीतील सरकारला कामे करू देत नाहीत. सरकारच्या कामात केंद्राची आडकाठी सतत सुरू असल्याचा आरोप अनेकवेळा आपकडून करण्यात आला आहे. बलात्कार, फसवणूक, विनयभंग आणि आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणे, अशा गुन्ह्यांच्या आरोपाखाली आपच्या सुमारे 14 आमदारांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. यातील तिघांविरोधातील दोषसिद्धी झाली असून अन्य प्रकरणांचा तपास अद्याप सुरू आहे. एवढेच नव्हे तर केजरीवालांवर अब्रुनुकसानी प्रकरणी चार खटल्यांची चौकशी सुरू आहे. यापैकी एक फौजदारी स्वरुपाच्या अब्रुनुकसानीचा खटला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दाखल केला आहे.
2015 मध्ये दिल्ली विधानसभेच्या 70 पैकी 67 जागांवर ऐतिहासिक विजय मिळवत दिल्लीची सत्ता काबीज केलेल्या आपला अलीकडेच झालेल्या दिल्ली महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये जोरदार आपटी खावी लागली आहे. तर दुसरीकडे आपचे नेते कुमार विश्‍वास यांनी दिल्ली महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये झालेला पराभव मतदान यंत्रांमुळे नसून आपच्या चुकीच्या धोरणांमुळे झाला असल्याचा घरचा आहेर दिला. आपच्या नेत्यांवर सुरू असलेल्या खटल्यांना आम्ही तोंड देऊ शकू. मात्र, पक्षातील काही मंडळी अंतर्गत राजकारण करत असून पक्षविचारांना बगल देत आहे, असे एका आपच्या नेत्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले.