Breaking News

बिहारमध्ये दारु मिळणार नाही, याची खात्री करा - नितीश कुमार

पाटणा, दि. 12 - बिहारमध्ये दारु मिळणार नाही किंवा अन्य राज्यातून बिहारमध्ये आणली जाणार नाही, याची खात्री करा, असे निर्देश बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज प्रशासकीय अधिकार्‍यांना दिले आहेत. 
नितीश कुमार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दारुबंदी संदर्भात उचलल्या जाणार्‍या कठोर पावलांचा आणि सुरू असलेल्या अंमलबजावणीचा विस्तृत आढावा घेतला. राज्यात कुठेही दारु मिळणार नाही किंवा अन्य राज्यातून आणून विक्री केली जाणार नाही. तसेच या प्रकारात सामील असणार्‍यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, याची खात्री करण्याचे निर्देश कुमार यांनी दिले. सध्या कारागृहात शिक्षा भोगणारे गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेले नेते शहाबुद्दीन आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यातील संभाषणाची चित्रफित समोर आली. यामध्ये शहाबुद्दीन राज्यातील दारुबंदी विरोधात बोलत आहेत आणि दारु माफियांशी संवाद करत असल्याचे स्टिंग एका वृत्तवाहिनीने केले होते. तसेच दारु सेवन आणि दारुची तस्करी करणार्‍यांविरोधात सुरू केलेल्या मोहिमेतून सुमारे 9 लाख लीटर दारु उंदीरांनी फस्त केल्याचे वृत्त अलीकडेच प्रकाशित झाले. या सर्व घटनांच्या पार्श्‍वभूमीवर नितीश कुमार यांनी निर्देश दिले आहेत.