औरंगाबाद विद्यापीठात लंच होम सुरू
औरंगाबाद, दि. 11 - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रशासकीय इमारतीसमोरील ‘लंच होम’ अखेर सुरू करण्यात आले आहे. ‘बुद्धजयंती’चे औचित्य साधून आज औपचारिक लोकार्पण करण्यात आले आहे. दोन वर्षांपासून इमारत तयार असली तरी विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचार्यांच्या उपयोगात नव्हती. येथे हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांचा मानस होता. अखेर त्यांनी हा निर्णय मागे घेऊन फक्त ‘लंच होम’साठी निविदा काढली आहे. सुमारे दीड कोटी रुपये खर्चून तयार केलेले ‘लंच होम’ अनेक दिवसांपासून लोकार्पणाच्या प्रतीक्षेत होते. 23 ऑगस्ट 2016 रोजी यूजीसीचे अध्यक्ष डॉ. वेदप्रकाश यांच्या हस्ते या वास्तूचे उद्घाटन करण्यात आले आहे. त्यानंतर मागील नऊ महिन्यांत प्रत्यक्षात ‘लंच होम’ वापरात आलेले नव्हते. येथे फर्निचर आणि शुद्ध पेयजलाचा प्रकल्प नसल्यामुळे निविदा काढण्यात आलेली नव्हती. मात्र, विद्यापीठाने एक्स्पर्ट सेल्स सर्व्हिसेसच्या संचालक सीमा गिल यांच्यासोबत करार केला असून त्यांना कार्यादेशही दिलेला आहे. गिल यांच्यावतीने अभिजित जाधव ‘लंच होम’चे संचालन करणार आहेत. त्यामुळे त्यांनीच बुद्ध जयंतीचे औचित्य साधून पुन्हा एकदा औपचारिक लोकार्पण करण्याचे ठरवले होते. एसएफआय आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने याच मागणीसाठी आंदोलन केले होते. आता येथे फर्निचर आणि आर. ओ. प्लांटचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.सुहास मोराळे यांनी दिली.
