Breaking News

राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात विरोधी पक्षांकडून हालचालींना वेग

नवी दिल्ली, दि. 04 - राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधी पक्षांकडून संयुक्त उमेदवार उभा करण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून प्रयत्न केले जात आहेत. या प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, माजी केंद्रीय रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. याशिवाय काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स चे नेते ओमर अब्दुल्ला यांनीही दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतली.
सोनिया गांधी ह्या लवकरच उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती व पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत. उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा केली. लवकरच ते ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत. राहुल व सोनिया द्रमुक पक्षाचे नेते एम.के. स्टालिन यांचीही भेट घेणार आहेत. राष्ट्रपतीपदाबरोबरच उपराष्ट्रपती पदासाठीच्या संयुक्त उमेदवारीबाबतची चर्चा या नेत्यांमध्ये झाली आहे.
राजकीय पार्श्‍वभूमी असलेल्यांसह अन्य क्षेत्रातील मान्यवरांच्या नावांचाही उमेदवारीसाठी विचार केला जात आहे. यानंतर आम आदमी पक्ष व बिजू जनता दलाच्या प्रमुखांशीही चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.