Breaking News

पार्श्‍वभागात घालावा तुरीच्या दांड्याचा भाला... बांधूनी बांधावर बडवावा सांडागत साला...

दि. 12, मे - मराठी भाषा वळवावी तशी वळते. अर्थ काढला तसा निघतो. गाव परिसरपरत्वे बोली भाषेत येणारे अनेक शब्द सार्वजनिक ठिकाणी वापरले गेले तर विपर्यास होतो,वादंग होतो. अजित पवार यांनी ती चुक गेली.चुक उमगली. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती स्थळावर जाऊन आत्मक्लेशही केला.पण साल्यांचं काय? माफीनामा तोंडावर मारून प्रकरण मिटवायचं का?
एका बाजूला मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस विरोधकांनी रान पेटवून महाराष्ट्रात निर्माण केलेले दुषित वातावरण निवळवून टाकण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतांना सत्तेच्या झाडाला लटकलेले एक बांडगूळ वटवागळासारखी विष्ठा करून वातावरण प्रदुषित करू लागल्याने देवेंद्र विरोधी लॉबी सक्रीय होत असल्याचा शोध लागतोय. साले, त्यांची सत्ता जाओ उडत पण या बांडगुळाच्या पार्श्‍वभागात तुरीच्याच दांड्याचा भाला करून वावराच्या बांधावर नेऊन अशा सांड प्रवृत्ती बडविण्याची तयारी आता अन्नदाता नक्की करील.
सन 2013-14 च्या दरम्यान महाराष्ट्रात दुष्काळाने जगण्याची लाही लाही झाली असताना तत्कालीन उपमुख्यमंञी तथा उर्जा मंञी अजित पवार यांनी पाणी प्रश्‍नाच्या अनुषंगाने केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले होते. त्याचा परिणाम इतका भयानक झाला की तेव्हढ्या दुष्काळातही असंतोषाच्या पुरात आघाडी सरकार वाहून गेले. तेव्हा अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचे स्तोम माजवून महाराष्ट्राच्या जनतेला जनतेला मुत पाजणार्या सरकार विरूध्द आलेल्या लाटेवर भाजपची मंडळी आयती स्वार झाली.
दोन वर्ष उलटून गेली.लोक ते आता विसरत आहेत.या मंडळींच्या कारभारापेक्षा वाचाळगिरी अजितदादांचे धरणातील मुञविसर्जन लोकांना विसरण्यास भाग पाडीत आहे, दोन वर्षात मुख्यमंञी आपल्या पातळीवर महाराष्ट्रातील सिंचनापासून शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांवर सातत्याने पाऊले उचलतांना दिसतात. कर्जमाफीच्या एकमेव मुद्यावर मुख्यमंञी ठाम हेकेखोर भुमिका घेत असले तरी तेव्हढा अपवाद वगळता शेतकर्यांविषयी मुख्यमंञ्यांची भुमिका योग्य दिशेने पाऊले टाकीत असल्याचे दिसते. मुख्यमंञी आपल्या भुमिकेवर, घेतलेल्या निर्णयावर अगदी शपथविधी पार पडल्यापासून ठाम आहेत.कितीही आक्रस्ताळेपणा केला आदळ आपट केली तरी ते विचलित होत नाही.परिणामी पक्षातील जेष्ठ श्रेष्ठापासून आम जनतेतही त्यांची लोकप्रियता वाढू लागली आहे हीच बाब विरोधकांपेक्षा त्यांच्याच पक्षातील काही मंडळींना सराट्याच्या काट्यासारखी बोचत आहे. म्हणून जाणतेअजाणतेपणे बेताल वक्तव्यातून निर्लज्ज संस्कारांची मालिका भाजपच्या काही मंडळींनी सुरू ठेवली आहे.
काल तर या निर्लज्जपणाने अक्षरक्षा कहरच केला.नाव रावसाहेब...पण प्रवृत्ती दानवी...ज्या शेतकर्‍यांच्या जीवावर खाऊन खाऊन पोसले त्यांच्या कष्टाच्या राशीवर वर तंगडी करून मुतण्याचा प्रमाद करण्याची हिम्मत या बहाद्दराने केली. कशातून आली ही हिम्मत? सत्तेचाच माज ना? किती दिवस असेल हा माज?
आयुष्यभर घाम गाळून शेतकर्‍याने भिकच मागायची? शेतकर्‍याच्या जीवावर मोठेपणा मिरवून आपल्या दिवट्यांच्या लग्नात लाखो करोडोंचा चुराडा करून रावसाहेबी थाट मिरवायचा? अशा कृतघ्न प्रवृत्तींना सजा तरी काय द्यावी, मिरच्यांची धुरी....? की तुरीच्या दांड्यांचा फोक पार्श्‍वभागावर मारून कातडी सोलून काढायची?... की भर ऊन्हात बांधावर बांधुन सांडासारखं बडवायच...अन्नदाता! तुच ठरवायच आहेस... या दानव पिलावळींच्या सत्तेचा माज कसा जिरवायचा...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दैनिक लोकमंथनने संपर्क साधला असता, रावसाहेब दानवे यांना तमाम महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची  व जनतेची माफी मागण्याच्या सूचना केल्या आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणत त्यांनी त्वरित लोकमंथनच्या विचारणाची दखल घेतली...