घोडागाडी चालक - मालकांच्या पुनर्वसन योजनेस मान्यता
मुंबई, दि. 23 : मुंबई शहरात पर्यटकांच्या मनोरंजनासाठी चालविण्यात येणार्या घोडागाडी आणि व्हिक्टोरिया बंद करण्यात आल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनासाठीच्या योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने शिफारशी केल्या होत्या. न्यायालयाच्या घोडागाडी बंद करण्याच्या निर्णयामुळे सुमारे 91 घोडागाडी मालक व 130 घोडागाडी चालक बाधित होणार आहेत तसेच त्यांच्याकडे असणार्या घोड्यांचेही पुनर्वसन होणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन उपसमितीने केलेल्या शिफारशींनुसार संबंधित घोडागाडी चालक व मालक यांना बृहन्मुंबईमध्ये उपलब्ध असलेल्या जागेवर पथविक्रीबाबतच्या निकषांनुसार फेरिवाला परवाना देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच फेरिवाला परवाना प्राप्त केलेल्या या बाधित घोडागाडी चालकांना 1 लाख रुपये एका वेळची एकरकमी आर्थिक मदत देण्यात येणार आहे. फेरिवाला परवाना न घेतल्यास 3 लाख रुपयांची एकवेळची एकरकमी आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वीच मंत्रिमंडळ उपसमितीने केलेल्या शिफारशीनुसार नगर विकास विभागाने घोडागाडी चालकांचे व्यवसायबाधित व्यक्ती म्हणून 9 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध केलेल्या पथविक्रेता योजना (उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियम) (महाराष्ट्र) योजनेत समाविष्ट करण्यासाठी तरतूद केली आहे.