आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमास दोन वर्षांची मुदतवाढ
मुंबई,दि. 23 : महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमास 31 मार्च 2019 पर्यंतच्या दोन वर्षांच्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यासह या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी 40 पदांना मुदतवाढ देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत विभागीय आणि जिल्हास्तरावर कार्यरत असलेल्या 40 पदांना दि.1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2019 या 2 वर्षाच्या कालावधीसाठी किंवा या कार्यक्रमासाठी निर्माण करण्यात आलेल्या पदांवर रितसर नियुक्त्या होईपर्यंत (यापैकी जे आधी घडेल त्या कालावधीसाठी) मुदतवाढ देण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर कार्यरत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि विभागीय स्तरावर कार्यरत विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक या पदास 30 हजार एवढे ठोक मानधन देण्यासदेखील मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणार्या कामांसाठी वार्षिक 13 कोटी इतक्या निधीसही या बैठकीत मान्यता देण्यात आली.