Breaking News

प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा सुरू करण्यासाठी कटीबध्द- सदाभाऊ खोत

सांगली, दि. 11 - सांगली जिल्ह्यातील सर्व प्रादेशिक पाणीपुरवठा योजना 30 वर्षापूर्वीच्या आहेत. त्या वापरासाठी जुन्या झाल्या आहेत. सध्या लोकसंख्येतही वाढ  झाली आहे. या बाबी लक्षात घेता या ठिकाणी राज्य शासन नवीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित करणार आहे. मात्र सध्याची भीषण पाणीटंचाई  लक्षात घेता सांगली जिल्ह्यातील सर्व प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा सुरू करण्यासाठी राज्य शासन कटीबध्द आहे, अशी ग्वाही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ  खोत यांनी दिली.
सदाभाऊ खोत यांच्या मुंबई येथील कार्यालयात सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व त्यांचा  वीजपुरवठा याबाबत सर्व संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांची बैठक झाली. त्यावेळी सदाभाऊ खोत बोलत होते.
राज्य शासन नागरिकांना पाणी देण्यासाठी कटीबध्द आहे. परंतु प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचे थकित वीजबिल भरण्यासाठी लोकसहभाग, ग्रामपंचायत, पंचायत  समिती व जिल्हा परिषद यांनीही आपला किमान वाटा उचलावा, असे आवाहन करून सदाभाऊ खोत म्हणाले, की संबंधित विभागाच्या मंत्री यांच्याशी चर्चा करून  त्यांना परिस्थिती अवगत केली आहे. या 30 वर्षे पूर्ण झालेल्या सर्व योजना पुनर्जीवित करण्यासाठी आता प्रयत्न करणार आहे.
संग्रामसिंह देशमुख यांनी सांगली जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीची माहिती दिली. सांगली जिल्ह्यातील जुन्या सर्व प्रादेशिक पाणीपुरवठा योजना नव्याने कार्यान्वित  करण्यात याव्यात. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची वीज तोडण्यात येऊ नये. ज्या पाणीपुरवठा योजनांची वीज तोडली असेल, अशा योजनांचा वीजपुरवठा तातडीने  सुरू करणे गरजेचे आहे. अन्यथा, नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. पिण्याचे पाणी टँकरने पुरवावे लागेल. त्यावर कोट्यवधी रूपये खर्च होईल.  प्रत्यक्षात लोकसंख्या अधिक असल्याने टंचाईग्रस्त सर्वच गावांना प्रत्यक्षात टँकरने पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संग्रामसिंह देशमुख यांनी यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे  याबाबत पाठपुरावा केला होता. या पार्श्‍वभूमीवरच ही बैठक झाली. या बैठकीत पलूस तालुक्यातील कुंडल येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवरही सविस्तर चर्चा  करण्यात आली. कुंडल प्रादेशिक पाणी योजनेचाही वीजपुरवठा तात्काळ सुरू करण्याबाबत कार्यवाही करीत आहे. याशिवाय कुंडल पाणीपुरवठा योजनेसह मणेराजुरी,  येळावी व पेड यासह 30 वर्षापेक्षा अधिक काळ झालेल्या सांगली जिल्ह्यातील अन्य योजनाही पुनर्जीवित करण्यात येणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.