Breaking News

वीज टंचाईमुळे ग्रामीण भागात आठ तासांचे भारनियमन

सोलापूर, दि. 11 - भर उन्हाळ्यात राज्याला वीज टंचाईस सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागात आठ तासांचे भारनियमन सुरू करण्यात आले  आहे. 24 तासांपैकी दिवसा आठ व रात्री आठ तास असा 16 तासच वीजपुरवठा करण्यात येत आहे. परिस्थिती बदलल्यानंतर पूर्ववत वीजपुरवठा करण्यात येईल,  असे महावितरणने म्हटले आहे.
राज्यातील सरकारला विविध कारणांमुळे विजेच्या मागणी आणि पुरवठ्याचा मेळ घालण्यात अडचणी येत आहेत. विजेचे नियोजन करण्यासाठी कृषी ग्राहकांच्या वीज  उपलब्धतेच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल केला आहे. दिवसा 8 तास व रात्री 8 तास अशा दोन टप्प्यांमध्ये रात्री एक वाजेपासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत अखंडित  वीजपुरवठा करण्यात येत आहे. वीज स्थिती बदलताच कृषिपंपांना दिवसा 8 तास व रात्री 10 तास वीजपुरवठा करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.
महावितरणला महानिर्मितीसह विविध स्रोतांकडून वीजपुरवठा होतो. परंतु विविध कारणांमुळे सुमारे 4000 मेगावॅट विजेची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे महावितरणने  1500 मेगावॅट भारनियमन केले आहे. ऊर्जामंत्र्यांच्या विशेष प्रयत्नामुळे बंद असलेले संच युद्धपातळीवर सुरू करण्याचे प्रयत्न चालू आहेत. तसेच इतर स्रोतांमधून  विजेची उपलब्धता वाढविण्यात येत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुरू असलेले तात्पुरते भारनियमन लवकरच बंद होईल, असा आशावाद महावितरणने  व्यक्त केला.