Breaking News

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाणी वाटपाचा अंतिम निर्णय

पुणे, दि. 04 - पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठ्याची सध्याची नाजूक परिस्थिती लक्षात घेता पुढील आठवड्यात होणार्‍या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाणी वाटपाचा अंतिम निर्णय घेण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी काल पत्रकार परिषदेत दिली . या धरणात सध्या 7 पूर्णांक 70 दशांश टी एम सी एवढा पाणीसाठा असून काटकसरीनं वापरल्यास तो कसाबसा 15 जुलै पर्यंत पुरु शकतो , मात्र त्यातूनच सध्या शेतीसाठीच्या पाण्याचं अखेरचं आवर्तन सुरू आहे . यापुढील काळात शेतीसाठी पाणी दिलं जाणार नसल्याचं राव यांनी स्पष्ट केलं . 
पुरंदर इथं होणार्‍या नियोजित आंतरराष्ट्रीय विमानातळाच्या भूसंपादनाची अधिसूचना निघाल्यापासून वर्षभरात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल असा विश्‍वास जिल्हाधिकारी राव यांनी व्यक्त केला . येत्या शुक्रवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांसमवेत याप्रकरणी बैठक होत असून त्यानंतर लगेचच अधिसूचना प्रसिद्ध होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला . विमानतळ प्रकल्पासाठी बाधित होणार्‍या प्रत्येक गावातील नागरिकांशी चर्चा करण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आली असून उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी या पथकाचं नेतृत्व करत असल्याचंही राव म्हणाले . या प्रकल्पासाठी एकंदर 2300 हेक्टर जागेचं सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.