Breaking News

विवाहातील अनावश्यक खर्चाला फाटा देऊन उभा केला आदर्श

संगमनेर, दि. 09 - करुया काही जगावेगळं, ज्यातून घडेल आदर्श नवा असाच काहीसा अनुभव संगमनेर तालुक्यातील समनापूर येथील ग्रामस्थांना आला. एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मुलीच्या विवाहाप्रसंगी सत्कारासारख्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन ती रक्कम अनाथ व निराधार मुलांच्या संगोपनासाठी देण्यात आली. वधु पित्याच्या या उपक्रमातून विवाह सोहळ्यात अनावश्यक खर्च करणार्‍यांपुढे नवा आदर्श निर्माण झाला आहे.
मालपाणी उद्योग समूहात सेवेत असलेल्या मच्छिंद्र रंगनाथ शेरमाळे, समनापूर यांची कन्या मंजुषा व सखाराम किसन गेठे यांचे सुपूत्र संदीप यांचा नुकताच विवाह झाला. यावेळी वधु पित्याच्या सुचनेला वर पित्याने सकारात्मक प्रतिसाद देत या सोहळ्यात अनावश्यक व केवळ परंपरा म्हणून पाळल्या जाणार्‍या प्रथेला फाटा देण्यात आला.
या सत्कारासाठी होणारा संपूर्ण खर्च समाजातील अनाथ, निराधार मुलांच्या संघर्षमय जीवनाला थोडाफार हातभार लावणारा ठरेल या उदात्त हेतूने वधु आणि वराकडील मंडळीने राजेश्‍वरी पकळे, माधुरी गेठे, अर्चना सूळ, सिद्धी वाघ, दुर्गा गुंजाळ, धनश्री जाधव, संस्कार आव्हाड, बाळु रुपवते या निराधार मुला-मुलींना प्रत्येकी अकराशे रुपये, तसेच संत शिरोमणी सावता महाराज मंदिर, सारथी फाऊंडेशन या संस्थांना आर्थिक सहकार्य केले. स्वयंप्रेरीत संस्थेतील मुलांसाठी हवेचा पंखा देण्यात आला.
या सोहळ्यासाठी आवर्जुन उपस्थित असलेले शिर्डी मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे, आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, भारतीय जनता पार्टीचे नेते राजेश चौधरी, सुदाम सानप, शरद थोरात, जनार्दन आहेर, अशोक सातपूते, इंदापूरच्या बाबीर देवस्थानचे अध्यक्ष अतिसिंह पाटील आदींनी शेरमाळे व गेठे परिवाराच्या या उपक्रमाचे भरभरुन कौतुक केले. दोन्ही कुटुंबांनी केलेला हा प्रयत्न समाजासाठी आदर्श ठरावा असाच असल्याची प्रतिक्रियाही मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली.