Breaking News

संगमनेर तालुक्यात सलग दोन दिवस वादळी वार्‍यासह गारपीठ

संगमनेर, दि. 09 - तालुक्यातील पठारभागात शनिवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. काही भागात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाल्याने डालींब, टोमॅटो व कांदा पिकांसह शेततळ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जवळपास 2 तासाच्यावर सुरू असलेल्या वादळी वार्‍यासह पावसामुळे शेतकर्‍यांची धांदल उडाली होती. रविवारीही तालुक्यातील काही भागात जोदर वार्‍यासह पाऊस झाला. नुकसानीचा आकडा पंचनामे झाल्यानंतरच समजणार असला तरी या गारपीटीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
शेती मालाला हमी भाव नसल्यामुळे शेतकरी वर्गाचे अधिच कंबरडे मोडले असताना काल तालुक्यातील पठारभागात वादळी वार्‍यासह पाऊस व गारपीट झाली. पठारभागातील घारगांव, बोटा, केळेवाडी, माळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. दुपारी 4 वाजेच्या सुमारास वादळी वार्‍यासह पावसाने अचानक सुरूवात केल्यामुळे शेतकर्‍यांची धांदल उडाली. त्यांनी काही हालचाल करण्याच्या आत सगळ काही संपल होत. डाळींब, टोमॅटो, कांदा पिकांचे यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. गारपीटीमुळे शेततळ्यांचे कागद फाटून मोठी हानी झाली. तारेवरची कसरत करून पाण्याचे नियोजन करत फळबागा जगविण्याचे काम शेतकरी वर्ग करत होता. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिनवल्याने तो आता मोडकळीस आला आहे. शेतीमालाला हमी भाव नाही, सरकार काही दखल घेईना, कुटूंबाचे शिक्षण, लग्न, आजारपण काढत शेतकरी वर्ग जगत आहे. बँकांचे भरसाठ कर्ज फेडण्यातच आयुष्य घालण्याची वेळ त्यांच्यावर येवून ठेपली आहे. यात निसर्गानेही साथ सोडली आहे. अनेक संकटांना तोंड देत असताना निसर्गाने असा घाला घातला आहे. 2 तास तुफानी वार्‍यासह पाऊस व गारपीटीने या परीसराला चांगले झोडपले. लाखो रूपयांचे यात नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मात्र हा आकडा आज पंचनाम्यानंतरच समजणार आहे. या संदर्भात प्रशासनाने दखल घेतली असून तहसिलदार साहेबराव सोनवणे हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. गारपीटग्रस्तांना शासनाची तातडीची मदत मिळण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
तालुक्यातील काही भागात रविवारी पुन्हा सुसाट वारा, विजेचा कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे कांदा, डाळींब व द्राक्षे पिकाला काही प्रमाणात फटका बसला आहे.
हवामान खात्याने येत्या 5 दिवसात वादळी वार्‍यासह राज्यात पाऊस होणार असल्याचे संकेत दिले आहेत. गेल्या 2 दिवसांपासून संगमेनरातील काही भागात वादळी वर्‍यासह पाऊस व गारपीट होत आहे. काल रविवारीही दुपारी 4 वाजेच्या सुमारास आश्‍वी पट्ट्यातील प्रतापपूर, शिबलापूर, उंबरी, शेडगाव, निमगावजाळी, वडगावपान कोकणगाव, समनापूर, कोल्हेवाडी, पोखरी हवेली आदी परिसरात सुसाट वार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे काढून ठेवलेला कांदा, डाळींब व द्राक्ष पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुरु झालेल्या पावसाने जवळपास तासभर हजेरी लावली. शेतकर्‍यांची पुन्हा एकदा पावसामुळे धादल उडाली. हा अवकाळी पाऊस नुकसान करणारा असल्याने शेतकरी वर्गाने अगोदरच उपाययोजना कराव्यात असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.