Breaking News

सहकारी बँका अडचणीत सापडल्याने शासनाने मदतीची भूमिका घ्यावी- आ. थोरात

संगमनेर, दि. 30 - नोटाबंदीमुळे देश व राज्यातील सहकारी बँकांकडे मोठ्या प्रमाणावर जुन्या नोटा पडून आहेत. त्यावरील व्याजाचा खर्चही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे सहकारी बँका अडचणीत आहे. अशा वेळी सरकाने मदतीची भूमिका घेवून बँकांच्या पाठीशी उभे रहावे असे आवाहन राज्याचे माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
जिल्हा सहकारी बँकेच्या संगमनेर मार्केट शाखेच्या एटीएम मशिनच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बाजीराव खेमनर, उपाध्यक्ष रामदास वाघ, शिवाजीराव थोरात, जि. प. सभापती अजय फटांगरे, रामहरी कातोरे, चंद्रकांत कडलग, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, तालुका विकास अधिकारी श्रीकांत गिरी आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. थोरात पुढे बोलतांना म्हणाले, नगर जिल्हा सहकारी बँकेकडे असलेले 168 कोटी रुपये अद्याप सरकारने स्विकारले नसून त्यावरील प्रतिदिनी एक लाख रुपये रोजचा व्याजाचा खर्च आहे. सरकारने ही रक्कम स्विकारुन त्यावरील व्याज जिल्हा बँंकेला द्यावे असे सांगतांनाच त्यांनी शेती मालाची दयनिय अवस्था या सरकाने केली असून कांदा, डाळींब या सारखी नगदी पिकांमध्ये शेतकरी पुरा उध्वस्त झाला आहे. भाजीपाल्याचीही तिच परिस्थिती आहे. सरकारला शेतीबद्दल काही कळत नाही असे नाही. त्यांना शेतकरी मारून लोकांना स्वस्त द्यायचे आहे. महागाई निर्देशांक खाली आणायचा आहे. अशी एकूण परिस्थिती दिसते. त्यामुळे शेतकरी प्रचंड कर्जबाजारी झाला असून त्याचे कर्जमाफ झाले पाहिजे. जिल्हा बँकांकडून शेतकर्‍यांना कर्ज वितरण होण्यासाठी सरकाने या बँकांच्या पाटीशी उभे रहाणे गरजेचे आहे.
आ.डॉ.तांबे म्हणाले, कुटुंबाचा किंवा समाजाचा विकास हा अर्थिक विकासातून होत असल्याने अनेक कुटुंबांना उभे करण्याचे काम जिल्हा बँक करत आहे. काटकसर,नियोजन व कर्जवाटप व कर्ज फेड यासाठीचे परिश्रम यावर प्रत्येक बँकेचे यश अवलंबून असते. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेने सामाजिक बांधिलकी जोपासतांना सामान्य माणसांमध्ये मोठा विश्‍वास निर्माण करुन त्यांच्या प्रगतीत योगदान दिले आहे.
बाजीराव खेमनर म्हणाले, सद्या शेतीमालाचे बाजारभाव पडल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. कर्जमाफीच्या आंदोलनांमुळे कर्ज वसुलीवर खुप मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. शेतकर्‍यांना देण्यात येत असलेल्या पिक कर्जामुळे बँकेला अर्धा टक्का तोटा होत आहे. मात्र आपल्या जिल्हा बँकेला 33 कोटींचा नफा हा साखर कारखान्यामुळे झाला आहे. शेतमालाचे भाव पडल्यामुळे शेतकर्‍यांनी ऊसाची शेती करावी असे अवाहन ही त्यांनी केले.
यावेळी रामदास  वाघ म्हणाले, जिल्हा बँकेतील कर्मचार्‍यांना बँकेच्या इतिहासात सर्वांत मोठी पगारवाढ ही आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आली आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालुन दिलेला आदर्श पायंडा बँकेने कायम जपला आहे. या पगारवाढीतून कर्मचार्‍यांना नवी उर्जा मिळणार आहे. तसेच जिल्हा बँकेतील सेवकांची पदोन्नोतीची प्रक्रिया ही बँकेने सेवकांच्या मिरीट प्रमाणे केली असल्याचे ही ते म्हणाले राप्रसंगी रावसाहेब वर्पे यांचेही भाषणे झाली.
याप्रसंगी प्रभाकर कादंळकर, संपत दिघे, प्रकाश कडलग, ज्ञानेश्‍वर सांगळे, बाळासाहेब चौधरी, भाऊसाहेब कोटकर, रमेश मंडलिक, हरीभाऊ कर्पे आदींसह सेवा सोसायट्यांचे सचिव, चेअरमन, संचालक, बँक शाखेंचे कर्मचारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक तालुका विकास अधिकारी बापुसाहेब गिरी यांनी केले तर आभार प्रकाश कडलग यांनी मांडले.