Breaking News

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

नवी दिल्ली, दि. 30 - सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्याविरोधात दिल्लीतील साकेत न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट  बजावले आहे. अब्रूनुकसानीच्या दाव्यात त्या गैरहजर राहिल्याबाबत न्यायालयाने त्यांना अजामीनपात्र बजावले आहे. 
खादी ग्राम व इंडस्ट्रीज कमिशनचे अध्यक्ष व्ही के सक्सेना आणि पाटकर यांनी परस्परांविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणी साकेत  न्यायालयात सुनावणी सुरु आहे. आज झालेल्या सुनावणीदरम्यान मेधा पाटकर गैरहजर होत्या. महानगर न्यायदंडाधिकारी विक्रांत वैद यांनी पाटकर यांच्यातर्फे  करण्यात आलेला युक्तीवाद फेटाळून लावला. पाटकर यांनी दिलेले कारण पटण्यासारखे नाही. न्यायालयाचा विश्‍वास संपादन करण्यात त्यांना अपयश आले आहे, असे  सांगत न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले. पाटकर या मध्य प्रदेशमधील एका गावात आंदोलनात व्यस्त असून दिल्लीला येण्यासाठी तिकीट  मिळाले नाही. म्हणून त्यांना सुनावणीसाठी उपस्थित राहता आले नाही, असे मेधा पाटकर यांच्या वकीलांनी न्यायालयात सांगितले होते. याप्रकरणाची पुढील सुनावणी  10 जुलै रोजी होणार आहे.