Breaking News

सदाभाऊ खोत म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना नव्हे - खा. राजू शेट्टी

सांगली, दि. 04 - कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना नव्हे, त्यांच्यावर आता कोणतीही संघटनात्मक जबाबदारी नाही. आता ते केवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एक कार्यकर्ते असून त्यांना शेतक-यांचा खराच कळवळा असेल, तर उद्या गुरूवारी दि. 4 मे रोजी कोल्हापूर येथे काढण्यात येणा-या मोर्चात स्वतःहून सहभागी होतील, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी लगावला. सदाभाऊ खोत यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सर्व पदातून मुक्त केल्याचेही त्यांनी जाहीर केले.
शेतकरी कर्जमाफी व ऊसदर या प्रश्‍नावर उद्या कोल्हापूर येथे काढण्यात येणा-या मोर्चाची माहिती देण्यासाठी येथे आयोजित पत्रकार बैठकीत राजू शेट्टी बोलत होते. या पत्रकार बैठकीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते महेश खराडे हेही उपस्थित होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने ठराव घेऊनच सदाभाऊ खोत यांना राज्य मंत्रिमंडळात पाठविले आहे. सध्या ते राज्यमंत्री असल्याने त्यांचे अधिकार कमी आहेत. राज्यमंत्री असल्याने त्यांना कॅबिनेट बैठकीतही बसू दिले नाहीत. त्यामुळे शेतकर्यांच्या दृष्टीने कोणताही ठोस निर्णय ते घेऊ शकत नाहीत. हे जरी खरे असले तरी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या केंद्र व राज्य शासनाचे उदो उदो करण्याची काहीच गरज नाही. राज्य शासनाच्यावतीने काढण्यात येणा-या संवाद यात्रेत सदाभाऊ खोत सहभागी झाल्यास शेतकर्यांची काय परिस्थिती आहे, हे त्यांना चांगलेच समजेल. मित्रपक्षांची अन्य नेतेमंडळी कशी वागतात, त्याच पध्दतीने त्यांनी वागावे, इतकीच आपली माफक अपेक्षा आहे, असेही राजू शेट्टी म्हणाले.
सदाभाऊ खोत नवखे असल्याने कदाचित त्यांच्याकडून भाजप सरकारचे कौतुक होत आहे. मात्र आता त्यांनी या सरकारच्या कौतुकाचा काही ठेका घेतलेला नाही, असे त्यांना ठणकावून सांगणार आहोत. सदाभाऊ खोत यांच्यावर आता कोणतीही संघटनात्मक जबाबदारी नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी डॉ. प्रकाश यांची निवड केली आहे. सदाभाऊ खोत म्हणजे संघटना नव्हे, तर संघटना हा कार्यकर्त्यांचा संच आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनात कोणालाही निमंत्रित केले जात नाही. एखाद्यास आवश्यकता वाटल्यास त्याने स्वतःहून या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही राजू शेट्टी यांनी केले.
विरोधी पक्षात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहकारी साखर कारखाना विक्री घोटाळा व जलसिंचन योजनेतील घोटाळ्यांबाबत बैलगाडीभर पुरावे असल्याची वल्गना करीत होते. मात्र सत्तेत येताच त्यांना त्यांच्या या भाषणांचा सिवर पडलेला आहे. सध्या त्यांनी शेतकरी हिताचा एकही ठोस निर्णय घेतलेला नाही. कांदा, सोयाबीन व तूर यासह अन्य पिकांना हमीभाव न मिळाल्याने शेतकर्यांची काय अवस्था झाली आहे? शेतकरी आत्महत्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली असून पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांवर 302 चा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी आग्रही असणा-या देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आता काय करायला हवे, असा प्रतिप्रश्‍नही राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.