Breaking News

नागठाणे परिसराचा तीर्थक्षेत्र म्हणून विकास करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध - सुभाष देशमुख

सांगली, दि. 04 - बालगंधर्व यांची जन्मभूमी व अध्यात्मिक वारसा लाभलेल्या नागठाणे या गावाचा तीर्थक्षेत्र म्हणून विकास करण्यासाठी राज्य शासन कटीबध्द आहे. त्यासाठी लोकसहभाग मिळावा, अशी अपेक्षा पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली.
नागठाणे (ता. पलूस) येथील उत्तरवाहिनी कृष्णा परिसर विकास संस्था व ग्रामपंचायत नागठाणे यांच्यावतीने दि. 1 ते 5 मे या कालावधीत आयोजित कन्यागत महापर्वकाळ सोहळ्याच्या उदघाटन कार्यक्रमात सुभाष देशमुख बोलत होते. या कार्यक्रमास आमदार डॉ. पतंगराव कदम, श्रीमती सुमन पाटील, मोहनराव कदम, सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, पलूस पंचायत समितीच्या सभापती श्रीमती सीमा मांगलेकर व नागठाणे गावच्या सरपंच श्रीमती माधुरी जोशी आदी उपस्थित होत्या.
प्रत्येक 12 वर्षानंतर येणारा कन्यागत महापर्वकाळ अत्यंत शुभ मानला जातो. याठिकाणी लाखो भाविक अभ्यंग स्नान करून पावित्र्य मिळवितात. अशा अध्यात्मिक गावाचा व परिसराचा सर्वांगिण विकास करण्यासाठी राज्य शासन स्तरावर प्रयत्न केले जातील. त्याचप्रमाणे या कन्यागत महापर्वकाळाचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार झाला पाहिजे. यापुढील कालावधीत होणार्या कन्यागत महापर्वकाळात येणार्या भाविकांना योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.
या परिसरातील अधिकच्या पाण्यामुळे जमिनीचा पोत कमी झाला असल्याने शेतकर्यांनी खताच्या मात्रा योग्य देण्यासह सेंद्रीय शेती करण्याकडे भर द्यावा. सांगली जिल्ह्यात बहुतांशी गावांना इतिहासाची मोठी परंपरा आहे. काही गावे प्रख्यात व्यक्तींची जन्मस्थळे अथवा कर्मभूमी आहेत. अशा गावांचाही विकास करण्यासाठी राज्य शासन स्तरावर प्रयत्न केले जातील. राज्य शासन तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील असून येत्या कालावधीत अशा तीर्थक्षेत्रांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाहीही सुभाष देशमुख यांनी दिली.
डॉ. पतंगराव कदम म्हणाले, की नागठाणे गाव अध्यात्मिक वारसा लाभलेले गाव असून या गावातील बालगंधर्व हे व्यक्तीमत्त्व संपूर्ण देशाला परिचित आहे. या गावच्या विकासासाठी या गावचा लोकप्रतिनिधी म्हणून सर्वतोपरी सहकार्य करून विकासकामांसाठी निधी दिला जाईल, असेही ते म्हणाले.
प्रारंभी उत्तरवाहिनी कृष्णा परिसर विकास संस्थेचे अध्यक्ष सुहास पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सचिव आनंदराव कोरे यांनी कन्यागत महापर्वकाळाची सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमात सुभाष देशमुख यांच्याहस्ते राज्यस्तरिय कृष्णाकाठ कृषी प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले व 200 विविध बी- बियाणांचा शोध लावणारे राष्ट्रपती पदक विजेते प्रकाश सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य नितीन नवले, प्रशांत वाळवेकर, सांगली जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, कृषी उपसंचालक मकरंद कुलकर्णी, तहसिलदार मधुसुदन बर्गे, हुतात्मा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी, क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरूण लाड व नागठाणे गावचे उपसरपंच भरत पाटील यांच्यासह ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.