Breaking News

अटक टाळण्यासाठी न्या. कर्णन यांनी देशाबाहेर पलायन केले ?

कोलकाता, दि. 11 - कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कर्णन यांनी देश सोडला असल्याची शक्यता कोलकाता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळीच कर्णन यांनी भारताची सीमा ओलांडून दुस-या देशात प्रवेश केला असल्याचे सांगण्यात येत आहे. अटक होऊ नये म्हणून कर्णन यांनी देश सोडला असावा, असा दावा कर्णन यांचे कायदेविषयक सल्लागार डब्ल्यू पीटर रमेश कुमार यांनी केला आहे. तसेच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे कर्णन यांना भेटण्यास तयार होतील तेव्हाच कर्णन भारतात परततील, असे कुमार यांनी सांगितले. कर्णन यांना सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी 9 मे रोजी त्यांना 6 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती.
कुमार म्हणाले की, कर्णन हे भारताची सीमा पार करुन नेपाळ किंवा बांगलादेशमध्ये गेले असण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. मात्र कर्णन यांनी कोणत्या मार्गाने पलायन केले, त्यांच्याबरोबर कोण आहे याबाबत कुमार यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.