Breaking News

डॉ. आंबेडकरांचे विचार हाच पिडीतांच्या विकासाचा राजमार्ग : रमेश शिंदे


सातारा, दि. 30 : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातियतेचे चटके सहन केले. त्यातून तावून सुलाखून निघाल्यानंतर त्यांनी स्वाभिमानाने शिक्षणाची कास पकडली. समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाच्या आधारे संविधान निर्माण केले. त्यामुळे डॉ. आंबेडकरांचे विचार हाच पिडीतांच्या विकासाचा राजमार्ग आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य सचिव रमेश शिंदे यांनी पिंगळी बु। ता. माण येथे केले.
यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आंबेडकर अनुयायी दिगंबर शिंदे होते. पिंगळी बु। ग्रामस्थ व बौध्द मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या युगपुरुषांच्या संयुक्त जयंती उत्सावाला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी सरपंच जिजाबाई जाधव, माजी सरपंच वामनराव जगदाळे, पंचायत समिती सदस्या कविताताई जगदाळे, अश्‍विनी ससगणे, कमलाकर जगताप, हिंदुराव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षिय भाषणात दिगंबर शिंदे म्हणाले, तरुणांनी कौशल्य अंगी बाळगून प्रतिष्ठा प्राप्त करुन देण्यासाठी श्रम केले पाहिजेत. सुतारकामामुळे मी अनेक वस्तूंच्या निर्मिती केल्या. रेल्वेमध्ये सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. डॉ. आंबेडकरी विचारांमुळे एक पिढी घडवण्याचे स्वप्न पूर्ण झाले. डॉ. आंबेडकरांचा आदर्श कायमस्वरुपी स्मरणात राहणारा आहे. प्रारंभी युगपुरुषांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी भगवान गौतम बुध्द, महात्मा फुले, छ. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला. त्यानंतर सामुदायिक त्रिशरण व पंचशील ग्रहण करण्यात आले. तसेच दिवसभर मुला-मुलींसाठी तसेच माता-भगिनींनी विविध स्पर्धेत सहभागी होवून आपल्या कलागुणांचे दर्शन घडवले.
सर्व ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे पिंगळी बु। गावात जातीनिर्मूलन झाल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले. यावेळी प्रा. अरुण जगदाळे, दिगंबर शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शरद शिंदे, बापू शिंदे, सोनाली शिंदे, शशिकला कांबळे, संगिता भालेराव, सुरेश कांबळे, मारुती जाधव, राजेंद्र जाधव, प्रवीण निकाळजे तसेच ग्रामस्थ व बौध्दजन मंडळाने मोलाचे सहकार्य केले. या जयंती सोहळ्यासाठी पिंगळी बु। ग्रामस्थ तसेच बौध्द बांधव पुणे, मुंबई, ठाणे परिसरातून मोठ्या संख्येने आले होते. त्यांचे स्वागत निलेश शिंदे यांनी केले.