Breaking News

जिल्हा बँकेकडून तालुका ग्रामोद्योग सहकारी संस्थांना व्याज प्रोत्साहन सवलत योजना : आ. शिवेंद्रसिंहराजे

सातारा, दि. 24 (प्रतिनिधी) : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाअंतर्गत असणार्‍या बलुतेदार ग्रामोद्योग संस्थांना आर्थिकस्थैर्य प्राप्त होण्यासाठी सभासदांचे उद्योग व्यवसायासाठी कंपोझिट लोन नं. 2 स्वरुपाचा खेळते भांडवल व भांडवली कर्जासाठी कर्ज पुरवठा केलेला आहे. यासाठी बँकेच्या संचालक मंडळाने सामाजिक बांधिलकी जोपासून संस्थांच्या हितासाठी सन 2016-17 चे बँकेच्या नफ्यातून ग्रामोद्योग संस्था कर्जदार सभासदांसाठी एकरक्कमी कर्ज परतफेड करणार्‍या सभासदांना येणे व्याजामध्ये सवलत योंजना सुरु केली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.  
नोटाबंदीनंतर बँकेच्या नफ्यावर परिणाम झाला असला तरीही बँकेने बलुतेदार संस्थांच्या कर्जदारांचे दिलेले योगदान महत्वाचे आहे. जिल्ह्याची अर्थवाहीनी असलेल्या बँकेने नेहमीच बँकिंग व्यवसाय करत असताना समाजातील लोकांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे बँक तळागाळातील लोकांपर्यत पोहचली आहे. योग्य नियोजन व अंमलबजावणी केल्यामुळे बँकेचा एनपीए शुन्य टक्के आहे. तालुका ग्रामोद्योग संस्थांचे कर्जदार व जामिनदारांना एकरक्कमी परतफेड योजनेचे निकष व धोरण सर्व संस्थांना व संस्थांचे कर्जदार व जामिनदार यांना सवलत योजनेबाबत पत्र पाठवून कळविले आहे. त्याच बरोबर ग्रामोद्योग संस्थांच्या वार्षिक साधारण सभेमध्येही याबाबत संस्थांनी याची माहिती दिल्यास जास्तीत-जास्त कर्जदार सभासद या योजनेचा लाभ घेतील अशी अपेक्षा बँकेच्या संचालक मंडळाने व्यक्त केली आहे. ग्रामोद्योग संस्थांचे कर्जदार सभासदांना या योजनेचा लाभ 31 ऑगस्ट 2017 अखेर देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.