Breaking News

केजरीवाल यांच्याविरोधात कपिल मिश्रा यांनी केले पुरावे सादर

नवी दिल्ली, दि. 09 - दिल्लीच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आलेले कपिल मिश्रा यांनी आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधातील पुरावे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सुपूर्द केले. आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी केजरीवाल यांना दोन कोटी रुपये देताना आपण बघितले असल्याचा आरोप कपिल मिश्रा यांनी काल केला होता. दरम्यान, ‘आप’ने मिश्रा यांना पक्षातून निलंबित केले आहे.
आज मिश्रा यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी 400 कोटी रूपयांच्या टँकर घोटाळ्याच्या तपासाला जाणूनबुजून विलंब केला असल्याचा आरोप करत त्या संदर्भातील पुरावे लाचलुचपत प्रतिबंधक विभागापुढे सादर केले. तत्कालीन मुख्यमंत्री शीला दिक्षित यांच्या काळात हा घोटाळा झाला असून या प्रकरणी चौकशी करण्यात येणार होती. मात्र मुख्यमंत्री केजरीवाल यांनी जाणूनबूजून या प्रकरणाच्या तपासात अडथळे निर्माण करत जनसामान्यांच्या कररूपी पैशाचा गैरवापर केला. तसेच, शीला दिक्षित यांनाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला, असे आरोप मिश्रा यांनी केले आहेत. या प्रकरणात केजरीवाल यांच्याबरोबरच आणखी दोघांचाही समावेश आहे. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी पुन्हा एकदा मला या प्रकरणाच्या तपशीलवार चौकशीसाठी बोलवणार आहेत, असेही मिश्रा यांनी सांगितले.