Breaking News

नाशकात कुख्यात गुंडाच्या नातेवाईकांच्या लग्नात पोलिसांची हजेरी

नाशिक, दि. 24 - नाशिक शहरात दोन दिवसांपूर्वी सुरु असलेल्या लग्नसोहळ्यात पोलिसांची उपस्थिती होती. राजेशाही थाटाच्या या लग्नास नाशिकसह मुंबई तसेच  इतर जिल्ह्यांतील खासदार, आमदार, अभिनेते, अभिनेत्री यांसह विविध पक्षांच्या पदाधिका-यांची हजेरी होती. काही वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच कर्मचारीही हजर  होते. मात्र हे शाही लग्न कुख्यात आंतरराष्ट्रीय डॉन दाऊद इब्राहिम याच्या नातलगाच्या मुलीचे असल्याचे उघडकीस आल्याने उपस्थितांची धांदल उडाली आहे.  नाशकात झालेल्या या लग्नात देशभरातील डॉन, बुकी आणि मोठमोठ्या गुन्हेगारांचाही सहभाग असल्याचे समोर येत आहे.
त्यामुळे गुन्हेगारांच्या मांडीला मांडी लावून लग्नाचा पाहुणचार घेणा-या पोलिसांमागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. या पोलिसांचे जबाब घेतले जात असून त्याचा  अहवाल तयार करून कारवाईची पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
उंटवाडी रोडजवळील एका प्रशस्त जागेत राजेशाही थाटामाटात हा लग्नसोहळा झाला. या सोहळ्यात शहरातील अनेक प्रतिष्ठीत मंडळीही सहभागी झाली होती.  लग्नसोहळा शहरातील तसेच सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठीत व्यक्तीच्या घरातील असल्याने अनेकांनी हजेरी लावणे पसंत केले.
शहर पोलीस दलातील एक सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आदी अधिकारी तसेच कर्मचा-यांनीही हजेरी लावली.  मात्र हे लग्न देशात साखळी बॉम्बस्फोट घडवणा-या व दहशतवादी कारवाया करणा-या दाऊद इब्राहिमच्या जवळच्या नातलगांपैकी होते.