Breaking News

प्रभाग 33 मध्ये दारु दुकानास परवानगी देऊ नये - नगरसेवक देशमुख

जळगाव, दि. 24 - मेहरुण परिसरातील वार्ड क्रमांक 33 मध्ये कुठल्याही प्रकारच्या मद्यविक्री दुकानांना परवानगी देऊ नये, अशी मागणी नगरसेवक अनिल देशमुख  यांनी केली असून याबाबत त्यांनी आज आयुक्तांना निवेदन दिले. प्रभाग क्रमांक 33 परिसरात व्यावसायिक दारु दुकानासाठी प्रयत्नशील आहेत. याला परिसरातील  नागरिकांचा विरोध असून प्रशासनाने संबंधितांना कुठल्याही परिस्थितीत परवानगी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या 8 दिवसांपासून काहीजण  जागेचा शोध घेत आहेत व पाहणी करीत असल्याचे आढळून आले आहे. निवेदनावर परिसरातील नागरिकांच्या स्वाक्ष-या आहेत.
याप्रभागात गेल्या सहा ते सात महिन्यांपासून परिसरात नियमित सफाई होत नाही, महापालिकेचे कर्मचारी साफसफाईसाठी कधी येतात तर कधी येत नाहीत.  अस्वच्छतेबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्यामुळे या भागात नवीन सफाईचा मक्ता देण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक देशमुख यांनी केली आहे.
प्रभाग क्रमांक 33 मध्ये महापालिकेच्या निधीतून हॉटेल कस्तुरी ते मेहरुण, लक्ष्मीनगरपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. या रस्त्यावर नेहमी वाहनांची  वर्दळ सुरु असते. कामगार आणि शालेय विद्यार्थी दिवसभर या रस्त्याने ये जा करत असतात. तरी प्रशासनाने याठिकाणी गतिरोधक बसवावे, अशी मागणी नागरिकांनी  केली आहे. तसेच पंतप्रधान आवास योजनेंतर्गत झोपडपट्टीतील नागरिकांना लाभ व्हावा म्हणून या परिसरात सर्व्हे करुन त्याचा लाभ झोपडपट्टीवासियांना करुन द्यावा,  अशी मागणीही करण्यात आली आहे.