Breaking News

सव्वा कोटींची लाच घेताना केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यासह दोघांना अटक

मुंबई, दि. 09 - केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक नायक आणि दलाल धनंजय शेट्टी यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सव्वा कोटी रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी या दोघांना विशेष न्यायालयाने 15 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या पार्श्‍वभूमीवर दोन्ही आरोपींच्या घराची सक्तवसुली संचालनालय आणि सीबीआयच्या अधिका-यांनी सोमवारी झडती घेतली.
फिर्यादीला एका प्रकरणासंदर्भात 2016मध्ये एकदा सक्तवसुली संचालनालयातर्फे नोटीस जारी करण्यात आली होती. तशाच आशयाची नोटीस फिर्यादीला 2017मध्येही जारी करण्यात आली. त्यानंतर एक इसमाने आपण सक्तवसुली संचालनालयाचा अधिकारी असल्याची बतावणी करून हे प्रकरण ‘मिटवण्यासाठी’ मुंबईतील केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या सहाय्यक आयुक्तांशी संपर्क साधण्याचा सल्ला फिर्यादीला दूरध्वनीद्वारे दिला.
त्या सल्लानुसार फिर्यादी केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त नायक यांना भेटला असता त्याच्याकडून 15 कोटी रूपयाची लाच मागण्यात आली. यातील ‘पहिला हप्ता’ म्हणून सव्वा कोटी रूपये एक-दोन दिवसात जमा करण्यासही नायक यांनी फिर्यादीला सांगितले. सोमवारी ठरलेल्या वेळी ही रक्कम घेताना नायक आणि शेट्टी यांना सीबीआयने सापळा रचून रंगेहाथ पकडले. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.