Breaking News

खा. शरद पवार पुन्हा ’रयत’ चे अध्यक्ष

सातारा, दि. 10 (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी खासदार शरद पवार यांची फेरनिवड करण्यात आली आहे. सचिवपदी नगर येथील राधाबाई काळे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कर्‍हाळे यांची निवड झाली. चेअरमनपदावर डॉ. अनिल पाटील यांना कायम ठेवण्यात आले आहे. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 58 व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने रयतचे पदाधिकारी व मॅनेजिंग काऊंसिलचे सदस्य उपस्थित राहिले होते. 
रयत शिक्षण संस्थेची सर्वसाधारण सभा मंगळवारी सातार्‍यातील मुख्यालयात पार पडली. या सभेत हा निर्णय घेतला. उपाध्यक्षपदी शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार गणपतराव देशमुख, शंकरराव कोल्हे, जयश्रीताई चौगुले, एस. एम. पाटील, गोपीकिसन पाटील, अरुण कडू-पाटील या सहा जणांना संधी देण्यात आली. उच्च शिक्षण विभागाच्या सहसचिवपदी कोरेगाव येथील डी. पी. भोसले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयसिंह सावंत यांची, तर माध्यमिक विभागाच्या सहसचिवपदी आष्टा येथील महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास महाडिक यांची निवड करण्यात आली. मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य म्हणून डॉ. अनिल पाटील, अ‍ॅड. रवींद्र पवार, डॉ. एन. डी. पाटील, डॉ. पतंगराव कदम, आबासाहेब देशमुख, आमदार अजित पवार, अ‍ॅड. भगिरथ शिंदे, मीनाताई जगधने, रामशेठ ठाकूर यांची फेरनिवड करण्यात आली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर माजी मंत्री दिलीप कळसे-पाटील, राजेंद्र फाळके, बबनराव पाचपुते या तिघांना संधी देण्यात आली आहे.