Breaking News

132 गावांत जलयुक्तची कामे तात्काळ सुरु करा : दळवी

सातारा, दि. 10 (प्रतिनिधी) : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मंजूर आरखड्यातील 132 गावांमध्ये लवकरात लवकर कामे सुरु करा, असे निर्देश विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिले.
येथील नियोजन भवनात जलयुक्त शिवार, वृक्ष लागवड व पाझर तलावातील गाळ काढण्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, उपवन संरक्षक अनिल अंजनकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, अधीक्षक अभियंता विजय घोगरे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संजय पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे यांनी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामांचा आढावा सांगितला. यानंतर मार्गदर्शन करतांना विभागीय आयुक्त दळवी म्हणाले, गेल्या वर्षी सातारा जिल्ह्यामध्ये जलयुक्तचे काम चांगले झाले. यावर्षीही जलयुक्तचे काम चांगल्या पध्दतीने करुन इतर जिल्ह्यांसाठी एक आदर्श निर्माण करावा, यासाठी प्रत्येक अधिकार्‍यांनी जबाबदारीने कामे करुन कामांना गती द्यावी. तीन लाखांच्या आतील कामांच्या वर्क ऑडर 15 दिवसांच्या आत गेल्या पाहिजेत. सातारा जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त कामांची पहाणी करण्यासाठी मुख्यमंत्री महोदय येणार आहेत. त्या दृष्टीने कामे करावीत. जलयुक्तच्या कामांचा सन 2017-18 चा आराखडा येत्या 15 तारखेपर्यंत पाठवा. ज्या गावांमध्ये जलयुक्तची कामे मंजूर झालेली आहेत. त्या गावातील कामे तात्काळ सुरु करा. यांत्रिकी विभागाकडील मशिनरींचा वापर प्रामुख्याने पाझर तलावातील गाळ काढण्यासाठी करावा. डीपसीसीटीच्या कामांसाठी लोकसहभाग घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
यावेळी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल म्हणाल्या, झीरो पेन्डंसीबाबत वेळोवेळी आढावा घेतला जाईल. संगणकीकृत सातबाराचे काम येत्या 15 जूनपर्यंत पूर्ण करण्यात येईल. जलयुक्तच्या कामांबाबत काही अडचणी आल्यास थेट माझ्याशी संपर्क करावा. निश्‍चितच अडचणी सोडविल्या जातील. जलयुक्तच्या कामांना महत्व द्या. कामात दिरंगाई करु नका. सातारा जिल्हा हा विविध योजना राबविण्यात राज्यात अग्रेसर आहे. प्रत्येक अधिकार्‍यांनी जलयुक्तच्या कामात शंभर टक्के योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीस प्रांताधिकारी अस्मिता मोरे, दादासाहेब कांबळे, डॉ. स्वाती देशमुख-पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी व विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.