Breaking News

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन भरपाई द्या- आ. डॉ. तांबे

संगमनेर (प्रतिनिधी), दि. 10 - संगमनेर तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने भरपाई द्यावी अशी मागणी आ. डॉ.सुधीर ताांबे यांनी केली. 
यावेळी सभापती अजय फटांगरे, तहसिलदार साहेबराव सोनवणे, कृषी अधिकारी कारभारी नवले, सरपंच विकास शेळके, बबन कुर्‍हाडे, बापू जाधव, सुहास वाळूंज, अ‍ॅड.सुहास आहेर आदींसह ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. डॉ. तांबे यांनी घरपडझडीमुळे नुकसान झालेल्या नागरीकांची विचारपुस केली. तसेच नागरिकांनी घरे, गोठे तसेच शेतातील पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. आ. तांबे म्हणाले कि, शेतकरी हा जगाचा पोशींदा आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे अगोदरच शेतकरी मोठया प्रमाणात अडचणीत आला आहे. त्यातच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी वर्ग मोठा हवालदिल झाला आहे.आमदार बाळासाहेब थोरात यांनी सतत शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासाठी शासनाकडे पाठपुरावा केला आहे.अवकाळी पावसाने अनेकांच्या फळबागा व घरे उध्दवस्त झाले.शासनाने या सर्व शेतकरी वर्गाला दिलासा देतांना तातडीने भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.
पावसाने व त्यातही गारांच्या मार्‍यामुळे डाळींब, द्राक्षाच्या बागा, टॉमेटो व कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. या पावसाने परिसरातील काही तलाव पूर्ण भरले तसेच लहान बंधारे पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागल्याने अकलापूर रस्ता पाण्याखाली जाऊन वाहतुक बंद झाली होती.
आ. डॉ. सुधीर तांबे यांनी प्रशासनाला व पदाधिकार्‍यांना नुकसानग्रस्त भागाला भेट देवून तेथील परिस्थितीची पाहणी करुन तातडीने नुकसानीचे पंचनामे करुन शासनास सादर करण्याचे आदेश दिले आहे.