Breaking News

सेवा हमी कायद्यावर रत्नागिरीत विशेष अभियान

रत्नागिरी, दि. 05 - रत्नागिरीतील जनजागृती संघ व क्षत्रिय मराठा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने सेवा हमी कायदा माहिती अभियान कार्यक्रमाचे आयोजन  केले आहे. येत्या रविवारी (दि. 7 मे) सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रा. भा. शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिर सभागृहात कार्यक्रम होईल.
शासकीय कार्यालयातील कामासाठी सामान्य लोकांना खेपा माराव्या लागतात. मात्र आता शासनाने सेवा हमी कायदा लागू केल्याने प्रत्येक कामासाठी मुदत ठरवून  दिली आहे. या कायद्याची योग्य अंमलबजावणी व नागरिकांना माहिती मिळण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. भारत देश लोकशाही राज्यपद्धतीचा  देश आहे. प्रशासकीय यंत्रणा हा लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये फार महत्त्वाचा घटक आहे. गतिमान व सुयोग्य प्रशासन हे समृद्ध लोकशाहीचा प्रतीक आहे.  आपल्या दैनंदिन जीवनात सार्वजनिक किंवा शासन व्यवस्थेमधील कामांमध्ये नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामध्ये कामासाठी लागणार वेळ  आणि माराव्या लागणार्या खेपा यासारखी अडचण प्रामुख्याने असते.
नागरिकांच्या या अडचणी लक्षात घेत गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक प्रशासनाचा नागरिकांना लाभ मिळावा म्हणून शासनाने सेवा हमी अधिनियम कायदा  लागू केला आहे. या कायद्याच्या परिणामकारक अंमलबाजावणीमुळे नागरिकांना प्रशासकीय कामात उद्भवणार्या अडचणी कमी होण्यास मदत होऊ शकते.  कोणत्याही कायद्याची परिणामकारकता कायद्याची माहिती किती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू, शकते यावर अवलंबून असते. शासनाने लागू केलेल्या या  लोकाभिमुख कायद्याचा उद्देश, त्यातील विविध तरतुदी यांची माहिती जास्तीत जास्त लोकांना व्हावी, यासाठी प्रशासकीय प्रशिक्षण संस्था यशदाअंतर्गत सेवा हमी  कायदा माहिती अभियानाचे आयोजन केले आहे. जागरूक नागरिक, गतिमान प्रशासन हे तत्त्व लक्षात घेत जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा,  असे आवाहन जनजागृती संघाने केले आहे.