Breaking News

वसंतदादा कारखान्यासाठी सहाजणांच्या निविदा?

सांगली, दि. 05 - वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना व डिस्टिलरी प्रकल्प भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी निविदा दाखल  करण्याची मुदत गुरूवार दि. 11 मे पर्यंत वाढविण्यात आली आहे. दाखल निविदा दुसर्यादिवशी दि. 12 मे रोजी उघडण्यात येणार आहेत, अशी माहिती सांगली  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी दिली.
वसंतदादा पाटील शेतकरी साखर कारखाना व डिस्टिलरी भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने निविदा मागविण्यात आल्या आहेत.  निविदा अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत बुधवार दि. 3 मे होती. या साखर कारखाना व डिस्टिलरी प्रकल्पासाठी सांगली जिल्ह्यातील राजारामबापू पाटील व  हुतात्मा किसन अहिर या दोन सहकारी साखर कारखान्यासह व्यंकटेश्‍वरा पॉवर्स, रेणुका शुगर, दत्त इंडिया व उगार शुगर या खासगी साखर कारखानदारांनी  निविदा अर्ज नेले आहेत.
या निविदा अर्ज नेलेल्या सर्वांनीच निविदा अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी प्री बीड बैठकीत केली होती. निविदा अर्ज नेलेल्या साखर  कारखानदारांनी उपस्थित केलेल्या शंका, प्रश्‍न, कायदेशीर बाबी व येण्या- देण्यांविषयीची माहिती आदी माहितीही मागितली होती. ही माहिती देण्यासही जिल्हा  मध्यवर्ती बँकेला एक- दोन दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यामुळेच संबंधितांना निविदा अर्ज दाखल करण्यास दि. 11 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली  असल्याचे दिलीप पाटील यांनी सांगितले.