Breaking News

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नी युती सरकारचा कानाडोळा - आ. पिचड

अकोले, दि. 30 - राज्य सरकारकडून शेतकर्‍यांच्या शेतीमालाला हमीभाव नाही, शेतकर्‍यांवर कर्जाचा डोंगर मोठया प्रमाणात वाढला असून शेतकर्‍यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, यासाठी विधान परिषदेत मी मागणी केली. व या सरकारने माझे निलंबन केले. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासाठी माझे कितीही वेळा निलंबन झाले तरी मी डगमगणारा कार्यकर्ता नाही. संघर्ष यात्रेला राज्यभरातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. मात्र हे सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाकडे कानाडोळा करत असल्याचा सनसनीत आरोप अकोले विधान सभा मतदार संघाचे लोकप्रिय आ. वैभव पिचड यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या 1 जुन रोजी आयोजित केलेल्या अभिष्टचिंतन पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.
यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम पा. गायकर, अभिनवचे अध्यक्ष मधुकर नवले, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मीनानाथ पांडे, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, अताएसो. अध्यक्ष जे. डी. आंबरे, तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, सरचिटणीस यशवंत आभाळे, महिला आघाडी अध्यक्षा चंद्रकला धुमाळ, युवक तालुकाध्यक्ष शंभु नेहे, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस राहुल देशमुख, अमृतसागरचे संचालक शरद चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. आ. पिचड पुढे म्हणाले की, माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची 61 वी साजरी करण्याचा या तालुक्यातील जनतेची मागणी असल्यामुळे तालुक्यातील जेष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात येणार आहे.
माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या वाढदिवसानिमित्ताने एकदरे येथे मोफत महाआरोग्य शिबीर ठेवण्यात आले असून त्याचे उद्घाटन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते संपन्न होवून या कार्यक्रमासाठी आ. सुधीर तांबे, यांच्या उपस्थितीत होणार आहे. व दुपारी 11 वाजता अगस्ती मंदिराच्या प्रांगणात अभिष्टचिंतन सोहळा होवून अनेकांचा यथोचित सन्मान केला जाणार आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी कोणतेही पुष्पगुच्छ न आणता या सोहळयासाठी आपली उपस्थितीती हाच आमचा ठेवा राहिल.
या सरकारला अजून किती दिवस कर्जमाफीबाबत अभ्यास करायचा आहे. सत्तेतील स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्व ठाकरे, राज्यात संघर्ष यात्रा काढत जनतेबरोबर भूलभुलया खेळत आहे. सध्या जलयुक्त शिवार फेरी अभियानात गावोगावी जावून शेतकर्‍यांच्या व्यथा जाणता का? का फोटोसेशन करत कार्यकर्ते आपले वेगळीच कामे करताना दिसतात. घोषणांचा पाऊस जोरात असला तरी प्रत्यक्ष मात्र काहीच घडत नाही. या देशाला जो शेतकरी दूध, भाजीपाला, धान्य पुरवितो त्याच बळीराजाचे चेष्ठा करण्याचे काम केंद्र व राज्य सरकारकडून सुरु आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत असून उद्योगधार्जिणे या सरकारला शेतकर्‍यांचा कोणताही कळवळा नाही. आयुष्यभर कोणतेही पदाची अपेक्षा न धरता जनतेसाठी व माजी मंत्री पिचडांबरोबर काम केलेल्या नागरिकांचा सत्कार करण्याचे भाग्य आमच्या सारख्या कार्यकर्त्यांला लाभले हेच आमचे भाग्य असल्याचे आ. पिचड यांनी सांगितले.
मधुकर नवले यांनी युती सरकारच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. श्री. गायकर यांनी 40 वर्ष राजकारणात राहून तालुक्याचे नंदनवण फुलविण्याचे काम ज्या नेत्यांनी केले. त्या नेत्याचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा व्हावा, ही आम जनतेची मागणी असल्याचे गायकर यांनी सांगितले. श्री. पांडे, जाधव यांनी देखील हे सरकार बळीराजाचे नसून उद्योगधार्जिणे लोकांचे असल्याचा आरोप केला. यावेळी आभार प्रदर्शन सचिव यशवंत आभाळे यांनी केले.