Breaking News

ओतुर ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीत संतोष तांबे विजयी

अकोले, दि. 30 - ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र 4 मधील एका जागेसाठी पोट निवडणूक झाली असून या निवडणुकीसाठी 2 उमेदवारांमध्ये थेट लढत होती. ही निवडणूक अतिशय अटीतटीची झाली यामध्ये भाजपाचे शहरअध्यक्ष संतोष देविदास तांबे 25 मतांनी विजयी झाले.
ग्रामपंचायत सदस्य संतोष प्रभाकर डुंबरे यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. यामुळे ही जागा रिक्त झाली होती. ही निवडणूक नागरिकांचा मागास प्रवर्गातील या एका जागेसाठी झाली. एका जागेसाठी येथील भाजपाचे शहराध्यक्ष संतोष देविदास तांबे आणि शिवसेनेच्या वाहतुक सेनेचे विवेक वसंत पानसरे यांच्यात थेट लढत झाली. या पोटनिवडणुकी करीता 1536 मतदारांनी मतदान केले. यात विवेक वसंत पानसरे यांना 739 मते मिळाली तर संतोष देविदास तांबे यांना 764 मते आणि नोटा 33 संतोष तांबे हे 25 मतांनी विजयी झाले. काही ठरावीक लोकांनी ही निवडणूक जाणीवपूर्वक बिनविरोध होऊ नये म्हणुन प्रयत्नांची पराकाष्ठा केली असल्याचे बोलले जातेय. जोरदार प्रचारामुळे कोण निवडुन येणार याबाबत संभ्रम अवस्थाच होती. अखेर निकालानंतर या ‘काटे की टक्कर’ निवडणुकीच्या वातावरणात शांतता झाली.
नवनिर्वाचित सदस्य संतोष तांबे यांची गावातून विजयी मिरवणुक काढण्यात आली. ओतुर वार्ड क्र.4 मधील मतदारांची नावेच यादीतून गायब झाली असल्याबाबत खुप चर्चा रंगल्या होत्या. या मतदार यादीचा नक्की काय घोळ आहे? सध्याची यादी बरोबर आहे? याप्रश्‍नांचे निवडणूक अधिकार्‍यांनी खुलासा करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.