Breaking News

आसलगांव येथील घरकूल लाभार्थीस अनुदान अदा

बुलडाणा, दि. 09 -  जळगांव जामोद तालुक्यातील आसलगांव येथील पंतप्रधान आवास योजनेतंर्गत श्रीमती गीताबाई दांडेकर यांना घरकूलाचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 6 मे 2017 रोजी बुलडाणा जिल्हा दौर्‍यावर असताना त्यांच्या घरी भेट देवून त्यांच्यासोबत संवाद साधला. मात्र यासंदर्भात ‘प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाच्या दिड लाख रूपये निधीपैकी तीस हजार रुपयेच या महिीलेला मिळाले’ अशा आशयाचे वृत्त प्रकाशित झाले आहे. सदर वृत्ताचे अंमलबजावणी यंत्रणा असलेल्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून खंडन करण्यात आले आहे. 
या वृत्तासंदर्भात अधिक वस्तुस्थितीदर्शक माहिती अशी, आसलगांव येथील लाभार्थी श्रीमती गीताबाई दांडेकर या वयोवृद्ध महिलेस पंतप्रधान आवास योजनेमधून सन 2016-17 यावर्षामध्ये घरकूल मंजूर करण्यात आले. या योजनेतंर्गत घरकुलाची किंमत 1 लक्ष 20 हजार रूपये एवढी आहे. या व्यतिरिक्त या लाभार्थीस महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना तसेच स्वच्छ भारत अभियान या योजनांचासुद्धा लाभ मंजूर करण्यात आला आहे. पंतप्रधान आवास योजनेमधून घरकुल ज्या लाभार्थ्यांना मंजूर केले जाते, त्या लाभार्थ्यांकडे जॉबकार्ड असल्यास मनरेगा व स्चछ भारत अभियान या योजनेचा लाभ देखील दिला जातो.
सदर योजनेमध्ये घरकुलाचे बांधकाम जसजसे पूर्ण केले जाते, तसतसे बांधकामाच्या प्रगतीनुसार तीन टप्प्यामध्ये सदर घरकुलाच्या अनुषंगाने लाभ अदा करण्यात येतो. श्रीमती गीताबाई दांडेकर यांना घरकुल बांधकामाचा पहिला हप्ता 30 हजार रूपये 21 फेब्रुवारी 2017 रोजी प्रत्यक्ष अदा झालेला आहे. त्यानंतर बांधकामाच्या स्थितीनुसार  त्यांना 60 हजार रुपये रकमेचा दुसरा हप्ता प्रत्यक्ष 4 मे 2017 रोजी मंजूर करण्यात आला आहे.  पंतप्रधान आवास योजनेची अंमलबजावणी अत्यंत पारदर्शक पद्धतीने कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय करण्यात येत असून लाभार्थ्यास अनुदानाची रक्कम सरळ लाभ हस्तांतरण (डायरेक्ट बेनेफीट ट्रान्सफर) या पद्धतीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते. त्यामुळे 4 मे 2017 रेाजी त्यांना मंजूर करण्यात आलेली 60 हजार रूपये एवढी रक्कम त्यांच्या खात्यामध्ये कोणत्याही क्षणी जमा होऊ शकते. ही प्रक्रिया संगणकीकृत प्रणालीद्वारे होत असल्यामुळे यामध्ये कोणत्याही मानवी हस्तक्षेप नसतो. सर्वात शेवटचा 30 हजार रूपयांचा हप्ता या घरकुलाचे शिल्लक काम म्हणजे प्लास्टरींग, दरवाजे बसविणे पूर्ण झाल्यानंतर तिसर्‍या हप्त्याच्या स्वरूपात संबंधित गटविकास अधिकारी यांचेकडून तातडीने मंजूर केला जाईल.
घरकुलाच्या लाभार्थ्याकडे मनरेगाचे जॉबकार्ड असेल, त्यांना मनरेगामधून मजूरीचा लाभसुद्धा देण्यात येतो. त्यांचे एकूण चार मस्टर काढले जातात. दरदिवशी लाभार्थ्यास 201 रूपये दराने 90 दिवसांची मजूरी अदा केली जाते. घरकुलाचे काम पूर्ण होताच चारही मस्टर्सपोटी देय असलेली रक्कम लाभार्थ्याच्या खात्यामध्ये संगणकीकृत प्रणालीमधून वळती करण्यात येते. स्वचछ भारत अभियानातंर्गत  श्रीमती गीताबाई दांडेकर यांना शौचालयासाठीसुद्धा लाभ देण्यात आलेला आहे. शौचालयाचे बांधकाम पूर्ण झालेले असल्यामुळे देय असलेले 12 हजार रूपये 21 फेब्रुवारी 2017 रेाजी प्रत्यक्ष अदा करण्यात आलेले आहे. या लाभार्थीबाबत सर्वच प्रक्रिया वेळोवेळी जलद  गतीने पूर्ण करण्यात आल्या असून कोणत्याही पद्धतीने कोणत्याही स्तरावर विलंब झालेला नाही, असे प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांनी कळविले आहे.