Breaking News

नांदुरा शासकीय तुर खरेदीत कोट्यावधीचा तुर घोटाळा उघड

बुलडाणा, दि. 09 -  येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यांर्डात 19 जानेवारीपासुन एफ.सी.आय च्या माध्यमातुन खरेदी विक्री सुरू केलेल्या शासकिय तुर खरेदीच्या टोकन व विक्री रजिष्टर मध्ये प्रचंड हेराफेरी व घोळ करून संचालक व व्यापारी यांनी संगनमताने कोट्यावधी रूपयांचा घोटाळा करून प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या हातावर तुरी दिल्याचा पर्दाफाश खरेदी विक्री संघ व कु.अ.बा.स.चे संचालक मनोहर देशमुख रा.सोनज यांनी दि. 05 मे रोजी जिल्हा निबंधक यांच्याकडे केलेल्या लेखी तक्रारीतुन कल्याने तुर विक्रीतुन त्यांचे उखळ पांढरे करणार्‍या संचालक व व्यापार्‍यांचे धाबे दनाणले आहे.
नांदुरा येथील शासकीय तुर खरेदीतील भ्रष्टाचाराची कल्पना या पुर्वीच शेतकर्‍यांना आल्याने त्यांनी रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याबाबत झालेल्या कोट्यावधी रूपयांच्या घोटाळ्याचे बिंग फोडण्यासाठी खरेदी विक्री व बाजार समिती संचालक मनोहर देशमुख यांनी टोकन व विक्री रजिष्टरच्या प्रति मिळवुन त्यांची चाचपणी केली असता विक्री रजिष्टर मध्ये शेतकर्‍यांच्या नावासमोर त्यांच्या क्षेत्रफळांच्या जागेत क्षेत्रफळ न लिहीता एम.टी.एम अशी नोंद असुन अनेकांच्या नावासमोर रिकाम्या जागा सोडल्या आहेत. त्याच बरोबर  यादीतील काही शेतकर्‍यांच्या नावावरील क्षेत्रफळाच्या नोंदी तक्रारकर्त्यांनी तपासल्या असता धक्कादायक वास्तव समोर आले असुन फक्त बारा गुंठठे ऐवढे क्षेत्रफळाची नोंद असलेल्या शेतकर्‍यांच्या नावावर नव्वद क्विंटल तुरीची विक्री झाली आहे. या यादीत शंभरपेक्षा जास्त शेतकर्‍यांच्या नावावर शेकडो क्विंटल तुरीची विक्री दाखवली असुन अत्यल्प क्षेत्रफळात एवढी तुर त्यांना पिकली की काही संचालकांनी कागदावर पिकवली या बाबत चौकशी होने गरजेचे आहे.
टोकन रजिष्टर मध्येही प्रचंड प्रमाणात खोडातोड करून व्यापार्‍यांनी सांगितलेली काही नावे खोडुन समाविष्ट करण्यात आलेली आहेत. एवढेच नाही तर टोकन रजिष्टर मध्ये नोंद असलेल्या कट्यांच्या वजनापेक्षा पाच पट ते दहा पट तुर विक्री रजिष्टर मध्ये विक्री झाल्याची नोंद आहे. सातबारे नसतांनाही काही नावे टाकून त्या नावांवर शेकडो क्विंटल तुरीची खरेदी दाखविण्यात आली आहे. तालुक्या बाहेरील व अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथिल काही नावांचा समावेश विक्री रजिष्टर मध्ये आहे. शंभर ते दिडशे किलो मिटर अंतरावरून कोन शेतकरी तुर विक्रीसाठी येथे आनत होता कि ती नावे सुध्दा फार्स  आहेत. याबाबतची चौकशी होने गरजेचे आहे. यापुर्वीच तुर खरेदी गौड बंगालाबाबत पोलीसात गुन्हा दाखल झाला असता काही हमालांना पोलीसांनी चोप दिला मात्र त्यांनी चौकशीत सांगितलेल्या संचालकांवर काहीच कारवाई केली नाही. ज्याला आरोपी करण्यात आले त्यांच्या नावावर यापुर्वी साठ क्विंटल तुरीची विक्री दाखविण्यात आली आहे. व त्याच्याच नावावर एकशे चौदा कट्टे जप्त दाखविण्यात आले आहेत. एफ.सी.आयचा बारदाना कसा व्यापार्‍यांकडे गेला याबाबतची चौकशी अद्याप झालीच नाही. बहुतांश शेतकर्‍यांची तुर आजरोजी घरात पडुन असतांना संचालक व व्यापारी यांनी हजारो क्विंटल तुरीची विक्री एफ.एस.आय ला करून कोट्यावधी रूपयांचा घोटाळा असुन त्यामध्ये विक्री रजिष्टर व चेक देणारी खरेदी विक्री संघ व टोकन रजिष्टर हाताळणारे बाजार समिती यांचा समावेश असल्याने या सर्वांची सखोल चौकशी करण्याची मागणी तक्रारकत्यांनी जिल्हा उपनिबंधक यांनी केलेल्या तक्रारीतुन केली आहे.