Breaking News

संभाजी पवार यांच्यामुळेच आपण चळवळीत घडलो- ना. सदाभाऊ खोत

सांगली, दि. 29 - संभाजी पवार यांच्या लढाऊ बाण्यामुळेच मी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून तयार झालो. त्यांचे बोट धरूनच मी राजकारणात आलो.  सर्वसामान्यांचा, कष्टकर्यांचा, हमालांचा, शेतकर्यांचा आमदार म्हणून त्यांनी सदैव आपली दारे उघडी ठेवली. त्यामुळेच ते खर्या अर्थाने जनतेचे आमदार होते, असे  गौरवोदगार कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काढले. 
माजी आमदार संभाजी पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त सांगली, कुपवाड, मिरज महापालिकेच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री खोत बोलत होते. यावेळी माजी मंत्री पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, उल्हास  पाटील, माजी आमदार अजितराव घोरपडे, दिनकर पाटील, महापौर हारूण शिकलगार, उपमहापौर विजय घाडगे आदि प्रमुख उपस्थित होते. सांगली येथील तरुण  भारत स्टेडियमच्या मैदानात संभाजी पवार यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र, चांदीची गदा देऊन सत्कार करण्यात आला.
सदाभाऊ खोत म्हणाले, की संभाजी पवार ज्यावेळी आमदार झाले, त्यावेळी आमदार व खासदार यांचे दर्शनही सामान्य नागरिकांना दुर्लभ होते. मात्र संभाजी पवार  यांच्या कार्यालयात सर्वांनाच प्रवेश खुला होता. त्यांचे कार्यालय म्हणजे जनतेचा खुला दरबार असायचा. त्यांच्यामुळेच शेतकर्यांना जाचक असलेली उसाची झोनबंदी  सरकारला उठवावी लागली. गुंठेवारीचा प्रश्‍नही सुटला. चळवळीच्या माध्यमातून समस्या कशा सोडवायच्या, ते आम्हाला संभाजी पवार यांनी शिकविले. त्यामुळे तेच  माझे खरे राजकीय गुरू आहेत.
पतंगराव कदम म्हणाले, की सत्ता आली, की तिचा फायदा सामान्य जनतेला कसा मिळवून द्यायचा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे संभाजी पवार होत. सभागृहात ते  बोलायला लागले, की मंत्र्यांनाही धडकी भरायची. मात्र, त्यांची सारी पोटतिडीक सर्वसामान्य नागरिकांसाठी होती. त्यामुळेच जनतेने त्यांना चार वेळा आमदार केले.
स्वागत नगरसेवक गौतम पवार यांनी केले. प्रास्ताविक सत्कार समितीचे अध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी केले. सूत्रसंचालन विजय कडणे यांनी केले. आभार पृथ्वीराज  पवार यांनी मानले.