सेरेब्रल पाल्सीच्या रुग्णांच्या पुनर्वसन व भौतिक उपचार केंद्राचे उद्घाटन
रत्नागिरी, दि. 30 - मुकुल माधव फाउंडेशन व फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या वतीने परटवणे येथील फिनोलेक्स कॉलनीमध्ये सेरेब्रल पाल्सीच्या रुग्णांच्या पुनर्वसनासाठी भौतिक उपचार केंद्राचे उद्घाटन आमदार उदय सामंत यांनी फित कापून केले. याप्रसंगी मुकुल माधव फाऊंडेशन व्यवस्थापकीय विश्वस्त रितू छाब्रिया प्रमुख उपस्थित होत्या. यावेळी आमदार सामंत म्हणाले की, सेरेब्रल पाल्सीच्या रुग्णांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात कक्ष निर्माण करण्यासाठी मी पाठपुरावा करत आहे. तसेच अनेक ठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रुग्णवाहिका सेरेब्रल पाल्सीच्या रुग्णांना ने-आण करण्यासाठी वापरण्यात आल्या पाहिजेत. याकरिता जिल्हा परिषदेचा ठराव करू. यामुळे महाराष्ट्रातही अशा रुग्णांना वाहतुकीसाठी रुग्णवाहिकांचा वापर करणे शक्य होऊ शकेल. मुकुल माधव फाउंडेशनने सेरेब्रल पाल्सीच्या रुग्णांसाठी निरपेक्ष भावनेने हा समाजोपयोगी उपक्रम सुरू केला आहे. अशा संस्थांना राजाश्रय देणे हे आमचे कर्तव्य आहे. अंदाजपत्रक समितीचा जालना येथे दौरा आयोजित केला होता. त्या वेळी आत्महत्याग्रस्त एका शेतकर्याच्या घरी भेट दिली. तेथे आई आणि एक अपंग मुलगा होता. आईने टाहो फोडला व याच्यासाठी काहीतरी करा असे सांगितले. त्या वेळी माझ्या डोळ्यांसमोर मुकुल माधव फाउंडेशनचे नाव आले आणि मी डॉ. मुळ्ये यांना फोन केला. त्यांनी पुढे संचेती रुग्णालयाशी संपर्क साधला. अशा रुग्णांसाठी मराठवाडा परिसरामध्ये मुकुल माधव फाउंडेशनने कार्य हाती घ्यावे, अशी सूचना आमदार सामंत यांनी केली. मुकुल माधव फाऊंडेशन व्यवस्थापकीय विश्वस्त रितू छाब्रिया यांनी सांगितले की, महाराष्ट्र व गुजरातमध्ये सामाजिक कार्य सुरू आहे. समाजाकडे पाहूनच आम्हाला या कार्यासाठी प्रेरणा मिळत आहे. समाजाने आणखी सहकार्य केल्यास मुलांचे आरोग्य व शिक्षण यात काम करण्याचे उद्दिष्ट आहे. सेरेब्रल पाल्सीचा हा उपक्रम सातारा, रत्नागिरी व पुण्यात सुरू आहे. सातार्याप्रमाणे रत्नागिरीमध्ये सेरेब्रल पाल्सीच्या रुग्णांच्या पुनर्वसनाचे काम हाती घेण्याची विनंती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केली होती. त्यानुसार मुकुल माधव फाउंडेशनने शिबिरामध्ये 237 रुग्णांची तपासणी केली. महिन्याभराच्या काळातच पुनर्वसन व भौतिक उपचार केंद्र सुरू झाले. राजापूरच्या साहिल परदळेवर शस्त्रक्रिया झाली असून या आठवड्यात आंबेगावच्या हिरा करोडे हिच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे, अशी माहिती डॉ. आशुतोष मुळ्ये यांनी दिली. नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी शहराचे सर्व ते सहकार्य या प्रकल्पासाठी लाभेल, अशी ग्वाही दिली. फिनोलेक्सचे व्यवस्थापकीय संचालक एस. एस. मठ यांनी फाउंडेशनचे सेवाकार्य, गोळप येथील मुकुल माधव विद्यालय आदीची माहिती दिली. कार्यक्रमाला लक्ष्मीनारायण मिश्रा उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या वतीने जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सावंत यांनी या उपक्रमास सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली. या वेळी जि. प. चे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये, डॉ. संदीप पटवर्धन, डॉ. सलोनी राजे, वैद्यकीय अधिकारी डॉ. ठोंबरे, अमेरिकेतील सर्जन डॉ. राज लाला आदी उपस्थित होते. डॉ. आशुतोष मुळ्ये यांनी सूत्रसंचालन केले. सचिन कुलकर्णी यांनी आभार मानले. उद्घाटन कार्यक्रमानंतर रुग्णांची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांनी केली. शिबिरामध्ये पुणे, कोल्हापूर, रत्नागिरीतील डॉक्टर्स सहभागी झाले होते.