Breaking News

मुंबईत समुद्रात बुडणार्‍या तीन तरूणांना वाचवण्यात यश

मुंबई, दि. 11 - मुंबईतील अक्सा किना-यावर अडकलेल्या तीन तरूणांना जीवरक्षकाने बुधवारी सकाळी सुरक्षित बाहेर काढले. नथुराम सुर्यवंशी असे या जीवरक्षकाचे  नाव असून तो 9 वाजता कामावर रूजू झाला. अंदाजे 10.25च्या सुमारास अक्सा किना-यावर लांब एका मोठ्या दगडावर तीन तरूण मदतीसाठी ओरडताना  सुर्यवंशी यांनी पाहिले. तत्त्क्षणी सुर्यवंशी यांनी पाण्यात उडी मारली आणि त्या तिघांना सुखरूप बाहेर काढले. अलताफ मोहम्मद इक्बाल (30), सर्फराझ रहीम शेख  (24) आणि सुरज गणेश प्रजापती (25) या तीन तरूणांची नावे आहेत.
हे तिघे सकाळी किना-यावर वेळ घालवण्यासाठी आले होते. ज्यावेळी ते मोठ्या दगडावर बसले त्यावेळी आसपास पाणी नव्हते. मात्र, थोड्याच वेळात भरती सरू  झाल्यामुळे त्या मोठ्या दगडाभोवती पाणी साठले. पाणी इतके होते की या तिघांना तेथून बाहेर पडणे अशक्य झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या नातेवाईकांशी संपर्क  साधला, मात्र नातेवाईक किना-यावर पोहोचण्याआधीचे सुर्यवंशी यांनी या तिघांना सुखरूप बाहेर आणले होते.