Breaking News

राज्यस्तरीय नाट्यसंगीत स्पर्धेचे पुण्यात आयोजन

पुणे, दि. 11 - बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे राज्यस्तरीय नाट्यसंगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, यंदाचे वर्ष हे नटसम्राट बालगंधर्व यांच्या पश्‍चोत  संगीत रंगभूमीची परंपरा समृद्ध करणारे स्वरराज छोटा गंधर्व यांच्या जन्म शताब्दीचे वर्ष आहे. त्याचे औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. संगीत  रंगभूमीला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून तरूण कलाकारांचा शोध घेण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सुरेश  साखवळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष नाना कुलकर्णी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. साखवळकर म्हणाले की, या राज्यस्तरीय स्पर्धेची प्राथमिक फेरी विविध शहरांमध्ये  होणार असून अंतिम फेरी पुणे येथे होणार आहे. दिनांक17 जून रोजी सांगली येथे , 18 जून रोजी रत्नागिरी येथे, 24 जून रोजी पुणे तर 25 जून रोजी मुंबई येथे  प्राथमिक फेरी होणार आहे. प्राथमिक फेरीतील विजेत्यांची अंतिम फेरी दिनांक 15 जुलै 2017 रोजी पुणे येथे होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके  आणि स्मृतीचिन्हे देण्यात येणार आहेत. ही पारितोषिके रविवार दिनांक 16 जुलै 2017 रोजी बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे होणार्‍या कार्यक्रमात समारंभपूर्वक प्रदान  करण्यात येणार आहेत.
कुलकर्णी म्हणाले की, या स्पर्धेत 16 ते 25 या वयोगटातील हौशी महिला आणि पुरुष कलाकार सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेसाठी एकूण 16 संगीत नाटकांची  निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये ‘सौभद्र’, मानापमान, विद्याहरण, संशयकल्लोळ, स्वयंवर, एकच प्याला, द्रौपदी, कान्होपात्रा, सन्यस्त खड्ग, सुवर्णतुला,  रणदुंदुभी, जयजय गौरी शंकर, मंदारमाला, कट्यार काळजात घुसली, हे बंध रेशमाचे आणि मत्स्यगंधा या संगीत नाटकांचा समावेश आहे. या नाटकांमधील  कोणत्याही 8 पदांची निवड स्पर्धकांना करता येणार आहे. त्यापैकी स्पर्धकाने स्वतःच्या पसंतीचे एक पद आणि त्यानंतर परिक्षक सांगतील ते एक पद सादर करावयाचे  आहे. यासाठी स्पर्धकाला प्रत्येकी 3 ते 5 मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे.