Breaking News

ग्रामस्थ आक्रमक;गॅस एजन्सीची माघार

अकोले, दि. 24 - प्रधानमंत्री उज्वला योजनेंतर्गत 100 टक्के अनुदानीत असणार्‍या गॅस योजनेसाठी जास्त पैशांची आकारणी गॅस एजन्सीचे लोक करत होते. यावेळी वारंघुशीतील लोकांच्या आक्रमक भुमिकेमुळे गॅस वितरण कपंनीने माघार घेत केवळ 100 रुपयाची पावती करत गॅस कनेक्शनचे वाटप केले.
वारंघुशी या गावामध्ये प्रधानमंत्री उज्वला योजने अंतर्गत 114 लोकांना गॅस वितरीत करण्यात येणार होता. त्यासाठीचा पहिला हप्ता हा 60 लोकांसाठी देण्यात येणार होता. ही योजना 100 टक्के मोफत असल्याचे मत गावातील लोकांचे होते. परंतु राजुर येथील एका गॅस वितरण कपंनीने वारंघुशी या गावातील प्रथम नागरिक असलेल्या व एका प्रतिष्ठित नागरिकाला हाताशी धरत 1741 रुपयाची पावती केल्याशिवाय गॅस वाटप करता येणार नसल्याचे सांगितले.
त्याचवेळी गावातील माजी पंचायत समितीचे सभापती सदाशिव घाणे व अविनाश पवार तसेच वारंघुशी गणाच्या पंचायत समिती सदस्या अलका अवसरकर यांनी हा गॅस भारत सरकारकडून मोफत असल्याचे गॅस लाभार्थींच्या लक्षात आणून दिले.
तसेच गावातील महिला व पुरुषांनी ही गॅस गाडी गावातून गॅस कनेक्शनचे वाटप केल्याशिवाय हलवू देणार नाही, अशी भुमिका घेतली.
राजूर येथील गॅस वितरण कंपनीला फोन लावला असता त्यांनी गावातील महीलांच्या आक्रमकतेपुढे नमते घेत 1741 रुपयांचे गॅस कनेक्शन फक्त 100 रुपये मोबदला घेत 60 कनेक्शनचे रात्री 9 वाजेपर्यंत वाटप केले. उर्वरित 54 कनेक्शन लवकरच पाठविण्यात येणार असल्याचे गॅस वितरण कंपनीकडून सांगण्यात आले.
जर उर्वरित 54 कनेक्शन लवकर दिले गेले नाही. तर वारंघुशी गणाच्या पंचायत समिती सदस्या अलका अवसरकर व गावातील महीला आंदोलन करणार असुन राजुर- घोटी हा रोड जोपर्यंत गॅस कनेक्शन येत नाही तो पर्यंत अडवुन ठेवण्याचा ईशारा संबधित वितरण कंपनीला दिला आहे.