Breaking News

अकोल्यातील 30 अतिक्रमणे हटवली

अकोले, दि. 24 - शहरातील बाजारपेठ रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा असणारी जवळपास 30 अतिक्रमणे अकोले नगरपंचायतीच्या अतिक्रमणविरोधी पथकाने जेसीबीने काढली आहेत. 
कोल्हार- घोटी राज्य मार्गालगतच्या महामुनी अगस्ती ऋषी प्रवेशद्वारापासून ते थेट काजीपुर्‍याच्या अलीकडील मस्जीदीपर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजुची अतिक्रमणे काल काढण्यात आली. यामध्ये गटारीवरील पायर्‍या, ओटे, ढापे, पडव्या, छताचे पत्रे, थेट जेसीबीने काढण्यात आले. शहराची मुख्य बाजारपेठ समजल्या जाणार्‍या या रस्त्यावर वाहतुकीला अडथळा करणारी ही अतिक्रमणे काढण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष अ‍ॅड. के. डी. धुमाळ नगरसेवक विजय सारडा, प्रमोद मंडलिक, माजी सरपंच संपत नाईकवाडी, नगरपंचायतीचे बांधकाम विभाग प्रमुख उत्तम शेणकर हे यावेळी उपस्थित होते. नगरपंचायतीच्या अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचार्‍यांनी ही कारवाई केली. अकोले शहरात अनेक ठिकाणी अशी रस्त्यावर अतिक्रमणे आहे. तसेच शासनाच्या व नगरपंचायतीच्या जागांवर ही अतिक्रमणे करण्यात आली असून ही अतिक्रमणे नगरपंचायत कधी काढणार? असा सवाल नागरीक करीत आहेत. तसेच शासनाच्या व नगरपंचायत मालकीच्या जागांवर शहरात अनेक वर्षापासून ही अतिक्रमणे झाली असून यामध्ये अतिक्रमणे करणार्‍या पदाधिकार्‍यांचीच संख्या मोठी आहे. त्यामुळे येथे नगरपंचायत कारवाई करेल का? असाही प्रश्‍न नागरीक करु लागले आहेत.