Breaking News

उतार्‍यावर फेरबदल करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी - मागणी

। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात मागासवर्गीय कुटुंबीयांचे उपोषण

अहमदनगर, दि. 24 - मागासवर्गीय कुटुंबीयांची शेतजमीनीच्या उतार्यामध्ये बेकायदेशीर फेरबदल करणारे तत्कालीन भ्रष्ट महसुल अधिकार्यांवर कारवाई करुन, अन्यायग्रस्त कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी मंगळवार दि.23 मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात आमरण उपोषण सुरु करण्यात आले. उपोषणाला अन्याय भ्रष्टाचार निवारण जनहित समीतीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला असून, उपोषणात भागचंद चक्रनारायण, ताराचंद चक्रनारायण, सुशिला साळवे, विजया कोल्हे, सुनिल चक्रनारायण, रंजना महांकाळे, अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष मिनहाज शेख, शहराध्यक्ष हुसेन शेख, सुखदेव चक्रनारायण, बाबासाहेब अल्हाट, सिताराम बोरुडे आदि सहभागी झाले आहेत.
नेवासा तालुक्यातील मौजे कवठे येथे गट नं. 353 या मागासवर्गीय कुटुंबीयांची शेतजमीन आहे. सदर जमीनीची मिळकत मागासवर्गीय कुटुंबीयांच्या पुर्वजांना शासनाकडून मिळाली होती. भोगवटदार वर्ग 2 प्रमाणे रेकॉर्ड ऑफ राईटला जमीनीची नोंद होती. मागासवर्गीय कुटुंबीयांचे पुर्वज अशिक्षित असल्याचा फायदा घेवून आनंदा काळे (मयत), सरसाबाई वने (मयत), रखमाबाई शेंडकर, तुकाराम काळे, अण्णा काळे, सौ.काळे, रामभाऊ लगन यांनी सदर शासनाकडून मिळकती बेकायदेशीररित्या वर्ग 1 करुन खरेदीखतासारखे तसेच पोकळीस्त बेकायदेशीर व्यवहार केला. यामध्ये तत्कालीन महसुल अधिकारींनी शेतजमीनीच्या उतार्यामध्ये बेकायदेशीर फेरबदल केल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.
या व्यवहाराची नकला मिळण्यासाठी अर्ज दिले असता, सदर कागदपत्रे आढळत नसल्याचा शेरा संबंधीतांनी दिला. वास्तविक पाहता सदर व्यवहार बेकायदेशीर असल्याने व त्याची दप्तरी नोंद नसल्याने सदरचे कागदपत्रे उपलब्ध होत नाही. सदर पोकळीस्त बेकायदा व्यवहार असल्याने सर्व्हे नं. 138 हा वर्ग 2 चा होता. तसेच सर्व्हे नं.139 हा वर्ग 1 चा असल्याने त्याचे विलनीकरण करताना सर्व्हे नं.138 चा असलेला वर्ग 2 चा शेरा जाणीवपुर्वक जमीन हडपण्याच्या उद्देशाने फेरफार करण्यात आला असून, सदर व्यवहाराची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.