Breaking News

ताकारी- टेंभूचे वीजबिल टंचाई निधीतून भरावे- विश्‍वजित कदम

सांगली, दि. 05 - ताकारी व टेंभू या उपसा जलसिंचन योजनांची वीजबिले टंचाई उपाययोजना निधीतून भरावीत, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस  यांच्याकडे करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्‍वजित कदम यांनी दिली.
पलूस व कडेगाव या दोन तालुक्यातील ताकारी व टेंभू योजनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत विश्‍वजित कदम बोलत होते. या बैठकीस  काँग्रेसचे सांगली ग्रामीण जिल्हा अध्यक्ष आमदार मोहनराव कदम उपस्थित होते. ताकारी व टेंभू या उपसा जलसिंचन योजनांचे पाणी सोडण्याचे योग्य नियोजन व्हावे, यासाठी या दोन्हीही योजनांची वितरण प्रणाली लवकरात लवकर विकसित करावी, अशी सूचनाही विश्‍वजित कदम यांनी केली.
या दोन्हीही योजनांच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही गावावर अन्याय होणार नाही, याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, अशी सूचना करून ते म्हणाले, की सध्या या  दोन्हीही योजनांतून पाणी सोडले जात असले तरी पाणी सोडण्याचे काटेकोरपणे नियोजन होणे गरजेचे आहे. येतगाव, कान्हरवाडी व तुपेवाडी शिव येथील लाभक्षेत्राला पाणी देण्यासाठी वितरिका क्रमांक सहाचे काम आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रयत्नातून मंजूर झाले आहे. हे काम तातडीने सुरू करावे. कडेगाव तलावात टेंभू योजनेचे पाणी थेट सोडण्यासाठी स्वतंत्र गेटची निर्मिती करावी, या तलावाचा टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रात समावेश करण्यासाठीच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करावा, लाभक्षेत्रातील कोरडे तलाव भरून घ्यावेत, अशी सूचनाही विश्‍वजित कदम यांनी केली.
या बैठकीस टेंभू उपसा जलसिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता तानाजी जेंगटे, ताकारी उपसा जलसिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता प्रकाश पाटील, युवा नेते डॉ. जितेश कदम, सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दीपक भोसले, टेंभू योजनेचे सहाय्यक कार्यकारी अभियंता नरेंद्र घार्गे, उपअभियंता एस. एम. पाटील, शाखा अभियंता एस. डी. गडदे व ताकारी योजनेच्या उपअभियंता श्रीमती योगिता पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.