विधायक कार्यासाठी समाजाला सकारात्मक विचारांची गरज
माजी कुलगुरु सर्जेराव निमसे यांचा सल्ला; कुलगुरुच्या सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल सेवापूर्ती सोहळा
अहमदनगर, दि. 10 - कोणत्याही विधायक कार्याची सुरुवात करताना विचार सकारात्मक असायला हवेत. पॉझिटिव्ह थिंकिग’ निश्चितपणे यशाकडे घेऊन जाण्यास मदत करते. तरुणाईने मोठी स्वप्ने जरूर पहावीत. परंतु ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आवश्यक असलेले कष्ट केलेच पाहिजेत. त्यासाठी महत्त्वकांक्षाही असली पाहिजे. अनेक वरिष्ठ पदांवर अपेक्षित गुणवत्तेच्या माणसांची कमतरता आहे. ती पात्रता मिळविणार्यांना नक्की संधी मिळेल, असे विचार लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सर्जेराव निमसे यांनी व्यक्त केले.लखनौ विद्यापीठातून सेवानिवृत्त झाल्याबद्दल नगमधील निमसे परिवारातर्फे त्यांचा रविवारी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. मुख्याध्यापक दिलीप पवार, प्रा. धनंजय शेवाळे, प्रा. नंदकिशोर देशमुख, डॉ. अतुल हंडोरे, रावसाहेब हंडारे, आडते व्यापारी अशोक निमसे, शशिकांत शिर्के, शिवाजीराव झरेकर आदी यावेळी उपस्थित होते.
निमसे म्हणाले, यशसाठी कोणत्याही शॉटकर्टचा अवलंब करुच नका. त्याचा भविष्यात टिकाव लागत नाही. त्यामुळे वेळ लागला तरी चालेल परंतु अभ्यास आणि यशाच्या नेमक्या मार्गावरूनच पुढे जावे. त्यांनाच भविष्यात मोठी संधी मिळते. सरकारतर्फे आरक्षणाच्या समितीवर तज्ज्ञ संचालक म्हणून झालेल्या निवडीतून निपक्षपातीपणे अहवाल देण्याचे काम करु. त्यात कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.’’
आडते व्यापारी पांडूरंग निमसे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. सर्जेराव निमसे यांच्या समाजाकार्याचा त्यांनी भाषणात गौरव केला. डॉ. निमसे यांच्यामुळे अनेकांना शिक्षणाची प्रेरणा, मदत व संधी मिळाल्याचे ते म्हणाले. विठ्ठल लांडगे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. गुरुदत्त ट्रान्सपोर्टर्च संचालक मच्छिंद्र कोलते यांनी आभार मानले.
