अनैतिक सबंधातून महिलेची आत्महत्या
संगमनेर तालुक्यातील कोळवाडे येथील घटना; एकावर गुन्हा दाखल
संगमनेर (प्रतिनिधी), दि. 10 - अनैतिक संबधाला विरोध करुनही होत असलेल्या छळास कंटाळून तालुक्यातील कोळवाडे येथील एका 35 वर्षीय विवाहीत महिलेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवार दिनांक 29 एप्रिल 2017 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास कोळवाडे येथे घडली.याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गेल्या पाच सहा वर्षापासून कोळवाडे येथील एका 35 वर्षीय आदिवासी विवाहीतेचे कनोली येथील पंढरीनाथ उर्फ अशोक नारायण वर्पे याच्या सोबत अनैतिक संबंध होते. या महिलेच्या मुली मोठ्या झाल्याने तिने या अनैतिक संबंधास विरोध करु त्याला घरी येण्यास मज्जाव केला. तिच्या नवर्यानेही अनेकदा वर्पे याला समजावून सांगितले. मात्र काही उपयोग झाला नाही. तरी त्याने दोघांच्या विरोधाला न जुमानता त्या महिलेच्या घरी येणे-जाणे सुरु ठेवले. या छळास कंटाळून अखेर या महिलेने शनिवार दिनांक 29 एप्रिल रोजी 11 वाजेच्या सुमारास कोळवाडे येथील राहत्या घरात अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यात ती गंभीर भाजल्याने तिचा मृत्यु झाला. या संदर्भात सहादू नाथू लहांगे यांनी तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरुन पंढरीनाथ उर्फ अशोक नारायण वर्पे याचेवर गुन्हा रजिस्टर नंबर 70/17 नुसार भारतीय दंड संहिता 306, 506 अनुसुचित जाती/जमाती प्रतिबंधक कायदा कलम 3 (ड) (5) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. या अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अजय देवरे करीत आहेत.
