Breaking News

डॉ. भाऊसाहेब कणसे यांचे निधन

सातारा, दि. 11 (प्रतिनिधी) : येथील सुप्रसिध्द बालरोग तज्ज्ञ डॉ. भाऊसाहेब कणसे (वय 70) यांचे प्रदीर्घ आजाराने काल पहाटे निधन झाले. गेल्या अनेक दिवसापासून डॉ. कणसे कर्करोगाने आजारी होते. त्यांना उपचारार्थ पुणे आणि सातारच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार करत असतानाच त्यांची प्राणज्योत मंगळवारी पहाटे मावळली. त्यांच्या पश्‍चात पत्नी डॉ. मंगला, विवाहित मुलगा, मुलगी तसेच तीन भाऊ, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
ग्रामीण व मागासलेल्या दुष्काळी अशा माण तालुक्यात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांचे बालपण गेले. बालरोगावर त्यांनी विविध वर्तमानपत्रातून सुमारे 300 च्यावर लेख प्रसिध्द केले आहेत. याचविषयावर हजाराच्या आसपास व्याख्याने दिली. सातारच्या रिमांड होमचे ते ऑनररी मॅजिस्ट्रेट व निवड समितीचे सदस्य होते. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिकच्या अभ्यास समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. एशिया पॅसिफीकच्या जानेवारी 994 च्या हुज हु मध्ये पाचव्या खंडामध्ये त्यांची छायाचित्रासह नोंद आहे. त्यांना प्राणीमित्र म्हणून ओळखले जाते.
साहित्यिक व कविता लेखन क्षेत्रातही त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. ख्यंगाट (कवितासंग्रह), खुशीतली गाजरं (बाल काव्यसंग्रह) अशी शेती माझी आई (कवितासंग्रह) सारं काही बाळाचं (बाल आरोग्य पुस्तक), आत्मचरित्र बेवड, वात्रटिका संग्रह ढुशी, त्याचबरोबर अस्सल माणदेशी भाग 1 व दोन हे व्यक्तीचित्रण संग्रह प्रसिध्द आहेत. त्यांनी आता लग्नाला चला या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्याचबरोबर ते नुसते लावण्यांचे रसिक नव्हते तर त्यांनी 100 हून अधिक लावण्या रचल्या होत्या. एक उत्कृष्ट कवि, लेखक, वक्ता, लावणीकार, गीतकार, कादंबरीकार, वात्रटिकाकार, चित्रपटनिर्माता, बालरोगतज्ज्ञ, समाजमित्र, प्राणीमित्र म्हणून त्यांना साहित्य भूषण पुरस्कार मिळाला होता.