Breaking News

गणिताच्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन

मुंबई, दि. 11 - रेझिंग अ मॅथेमॅटीशियन संस्था व राम रत्ना विद्यामंदिरातर्फ़े भाईंदर येथील आयोजित गणिताच्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन प्रा. मंगला गुर्जर  यांच्या उपस्थितीत 9 मे रोजी झाले. गणिताच्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबीरासाठी महाराष्ट्रासह 11 राज्यांमधून 115 विद्यार्थी भाग घेतला आहे. उद्घाटन समारंभ प्रसंगी  गुर्जर यांनी गणितात गती असलेल्या विद्यार्थ्यांच्या विशेष प्रशिक्षणाची गरज आहे असे सांगितले. सोबतच विद्यार्थिनींसाठी अधिक प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त  केली. समाजाने अशा कार्यशाळांना प्रोत्साहन व आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले आणि रामरत्ना विद्यामंदिर यांच्या विश्‍वस्तांचे ही  कार्यशाळा आयोजित केल्याबद्द्ल अभिनंदन केले. उत्तन विविधलक्षी शिक्षण संस्थेचे विश्‍वस्त यांनी सहभागी विद्यार्थ्यांना या कार्यशाळेत निवड झाल्याबद्दल अभिनंदन  केले आणि त्यांनी उद्याचे विश्‍वेशरैया, भास्कराचार्य असे उत्तम गणितज्ञ व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
रेझिंग अ मॅथेमॅटीशियन संस्थेचे अध्यक्ष प्रा.मंदार भानुशे यांनी शिबीराच्या मागची भूमिका स्पष्ट करताना देशाला भावी गणितज्ञ देण्यासाठी असा कार्यक्रम करण्याची  कल्पना सूचली, असे सांगितले.
संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. गोविंदा गोयल यांनी सूत्रसंचालन केले आणि संस्थेच्या स्थापने मागची प्रेरणा आणि पार्श्‍वभूमिका मांडली. संस्थेचे सचिव श्री. विनय नायर यांनी  या शिबीरासाठी मदत करणार्या सर्व संस्था व व्यक्तींचे आभार मानले. प्रा. हरिहरन जे अमेरिकेवरून या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष आले  आहेत. त्यांनीही सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व कार्यशाळेचे उद्दिष्ट सर्वांसमोर मांडले . उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी 200 पालक, शिक्षक व नागरिक उपस्थित  होते. शिबीराच्या समारोप रविवार 14 मे 2017 रोजी होणार आहे.