Breaking News

सुभेदारी विश्रामगृहातील कर्मचार्यांचे उपोषण दडपण्याचा प्रयत्न

औरंगाबाद, दि. 27 - विभागीय आयुक्त कार्यालयासमोर किमान वेतनासाठी लढा देणार्या सुभेदारी विश्रामगृहातील कर्मचार्यांचे उपोषण दडपण्याचा प्रयत्न होत आहे.  उपोषणाची दखल कामगार उपायुक्त तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे घेण्यात आल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे धाबे दणाणले आहेत.त्यामुळे संबधितांना  धमक्या देत त्यांचे उपोषण दडपण्याचा प्रयत्न होत आहे. सुभेदारी विश्रामगृहातील कर्मचार्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर किमान वेतनासाठी बेमुदत उपोषण  सुरू केले आहे.
गुरुवारी चौथ्या दिवशी आमदार इम्तियाज जलील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दिला. उपोषणाची दखल विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे घेण्यात  आली असून सार्वजनिक बांधकाम विभागाशी आयुक्त कार्यालयात कामगाराच्या शिष्टमंडळास चर्चा करावी, असे पत्र दिले. मात्र, चर्चा करण्याऐवजी बांधकाम विभाग  अधिकार्यांनी कर्मचार्यांना उपोषण मागे घेण्यास सांगितले. तसेच कामगार उपायुक्त अभय गिते यांच्या स्वाक्षरीचे एक पत्र उपोषणार्थींना देण्यात आले. यात सार्वजनिक  बांधकाम विभाग अधिकार्यांवर खटला दाखल करण्याच्या परवानगीचा प्रस्ताव कामगार आयुक्तांकडे पाठवलेला असल्याचा उल्लेख आहे.